मोहिनी केळकर : सकाळ संवाद दिवाळी अंक

मोहिनी केळकर : सकाळ संवाद दिवाळी अंक
Published on: 
रायझिंग मराठवाडा - मोहिनी केळकर -------- एका छोट्या गॅरेजमध्ये सुरू झालेल्या ‘ग्राइंड मास्टर्स’ या उद्योगाने आज संशोधन, नवकल्पना, पेटंट्स आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. या यशामागील विचार केवळ एका उद्योगाचा नसून भारताच्या विकासाचा दिशादर्शक ठरू शकतो. ‘ग्राइंड मास्टर्स’ची सुरवात मोठे भांडवल किंवा मोठे स्वप्न घेऊन झाली नव्हती. उद्योगाची सुरवात झाली ती एका ग्राहकाची समस्या समजून घेण्यापासून. निर्लेपसाठी बफिंग मशीन, त्यानंतर गिअर डिबरिंग, कुकर पॉलिशिंग आणि पुढे मायक्रो फिनिशिंगसारख्या अनेक तांत्रिक उपायांची निर्मिती करत कंपनीने मोहिनी केळकर यांच्या नेतृत्वाखाली स्वतःचा वेगळा मार्ग तयार केला. ---------- आज देशात विकासाच्या मॉडेलवर मोठी चर्चा सुरू आहे. पण, समाजाला थेट आर्थिक मदत, सवलती आणि अनुदान देण्याचा मार्ग अधिक परिणामकारक नाही. त्यापेक्षा उद्योगनिर्मिती, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यविकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून नागरिकांना सक्षम बनवावे’, असे परखड मत ग्राइंड मास्टर्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका मोहिनी केळकर यांनी व्यक्त केले. ------- गरजू व्यक्तींना मदत आवश्यकच आहे. मात्र, दीर्घकाळ थेट लाभ देण्याची मानसिकता समाजाला स्वावलंबी बनवत नाही. देशाच्या विकासासाठी तात्पुरत्या मदतीपेक्षा रोजगार निर्माण करणारे उद्योग, संशोधनाला चालना देणारी शिक्षणव्यवस्था आणि प्रत्यक्ष कौशल्य विकसित करणारी प्रशिक्षण व्यवस्था अधिक महत्त्वाची आहे. नागरिक सक्षम झाले, तर अर्थव्यवस्था आपोआप मजबूत होते. आत्मनिर्भर भारताची वाट उद्योग, नवसंशोधन आणि गुणवत्तापूर्ण मनुष्यबळातूनच जाणार आहे. मदत शिक्षण, आरोग्य, कौशल्यविकास आणि उद्योग उभारणीसाठी अधिक उपयुक्त ठरावी. उद्योग रोजगार निर्माण करतो, कौशल्य विकसित करतो, पुरवठा साखळी उभी करतो, नवीन उद्योजक घडवतो आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेला गती देतो’’, असे मोहिनी केळकर सांगतात. ---------------- फोकस असेल तरच मिळतो जागतिक दर्जा उद्योगाच्या सुरवातीच्या काळात विविध प्रकारची कामे केली गेली. मात्र, वर्ष १९९० नंतर कंपनीने केवळ ग्राइंडिंग आणि पॉलिशिंग या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. त्याच काळात ग्राइंड मास्टर्स हे नाव स्वीकारण्यात आले. एकाच क्षेत्रात सातत्याने संशोधन, प्रयोग आणि सुधारणा केल्यामुळे जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान विकसित झाले. अनेक भारतीय उद्योग एकाच वेळी अनेक क्षेत्रात विस्तार करण्याचा प्रयत्न करतात. पण, तंत्रज्ञानातील खोली निर्माण करण्यासाठी विशेषीकरण आवश्यक आहे. फोकस असेल तरच जागतिक दर्जा मिळतो, असे त्यांनी सांगितले. ------------------- संशोधनाशिवाय विकास नाही आज जागतिक बाजारपेठेत केवळ उत्पादन पुरेसे नसते. संशोधन, डिझाइन आणि पेटंट्स हीच खरी ताकद असते. ग्राइंड मास्टर्सने परदेशातील तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्यापेक्षा अधिक परिणामकारक भारतीय उपाय विकसित केले. त्यातून अनेक पेटंट्स मिळवण्यात कंपनीला यश आले. भारताने आत्मनिर्भर व्हायचे असल्यास उत्पादनाइतके संशोधनालाही प्राधान्य द्यावे लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ---------------- गुंतवणुकीकडे केवळ भांडवल म्हणून पाहू नये चीनने मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याबरोबरच संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण, स्थानिक भागीदारी आणि सरकारी गुंतवणुकीवर भर दिला. विदेशी गुंतवणूक स्वीकारताना स्थानिक उद्योगांना शिकण्याची संधी निर्माण केली. भारतातही विदेशी गुंतवणुकीकडे केवळ भांडवल म्हणून न पाहता ज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्य मिळविण्याची संधी म्हणून पाहण्याची गरज असल्याचे मत केळकर यांनी व्यक्त केले. -------------------- शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी कमी व्हावी आजही शिक्षण आणि उद्योग यांच्यात मोठी दरी आहे. विद्यार्थ्यांना पदवी मिळते. मात्र, उद्योगाला आवश्यक कौशल्ये अनेकदा त्यांच्याकडे नसतात. त्यामुळे शिक्षकांचा दर्जा, उद्योगातील प्रत्यक्ष अनुभव आणि इंडस्ट्री-अकॅडेमिया सहकार्य अधिक मजबूत करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर उद्योगात प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाल्यास रोजगारक्षम मनुष्यबळ अधिक वेगाने तयार होऊ शकते, असेही त्या म्हणाल्या. ----------------- आयटीआय आणि डिप्लोमा शिक्षणाला नवे बळ द्यावे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशनच्या चर्चेबरोबरच उद्योगांना आजही कुशल तंत्रज्ञ, मशीन ऑपरेटर आणि प्रत्यक्ष काम करणारे प्रशिक्षित कर्मचारी मोठ्या प्रमाणात आवश्यक आहेत. त्यामुळे आयटीआय डिप्लोमा आणि कौशल्याधारित शिक्षणाला अधिक आधुनिक सुविधा, उद्योगांशी जोडलेले प्रशिक्षण आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाची गरज असल्याचे मत केळकर यांनी व्यक्त केले. --------- शहरांचा विकासही उद्योगाइतकाच महत्त्वाचा उद्योग वाढण्यासाठी शहरांमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधा आवश्यक असतात. चांगले रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, हरित क्षेत्रे, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षित नागरी सुविधा उपलब्ध असतील तरच उद्योगांना अनुकूल वातावरण तयार होते. शहराचा दर्जा हा गुंतवणूक आकर्षित करण्यातील महत्त्वाचा घटक असल्याचेही त्यांनी सांगितले. ----------- विकसित भारतासाठी आवश्यक पाच सूत्रे उद्योगनिर्मितीला प्रोत्साहन संशोधन व पेटंट्समध्ये गुंतवणूक कौशल्याधारित शिक्षण उद्योग-शिक्षण संस्थांचा समन्वय उत्पादनक्षम आणि शिस्तबद्ध कार्यसंस्कृती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com