डाळी, तेल, सुकामेव्याचे दर वाढले
सणासुदीत महागाईचा भडका; किराणा खरेदीचे बजेट कोलमडले
-----
जळकोट, ता. १८ (बातमीदार) : दसरा, दिवाळीच्या तोंडावर किराणा साहित्याच्या दरांत वाढ झाली आहे. साखरेच्या दरात २२ तर सूर्यफूल तेलाच्या दरात १८ टक्के वाढ झाली आहे.
स्थानिक बाजारातही दरवाढीची झळ जाणवत आहे. गेल्या वर्षी किलोमागे ४२ रुपये असलेली साखर यंदा काही काळ ७६ रुपयांपर्यंत पोचली होती. सध्या ती ५५ रुपये किलो आहे. तूर डाळीचा दर ११५ रुपयांवरून १७० रुपये, तर मूग डाळीचा दर ९० रुपयांवरून १३० रुपये किलो झाला आहे. शेंगदाणा तेल १४० रुपयांवरून १८५ रुपये, तर सूर्यफूल तेल ११० रुपयांवरून १५५ रुपये प्रतिलिटर झाले आहे. दिवाळीच्या फराळासाठी लागणाऱ्या काजूचा दर ८०० रुपयांवरून ११०० रुपये, तर बदामाचा दर ७५० रुपयांवरून १०५० रुपये किलो झाला आहे. महागाईच्या वाढत्या दबावामुळे सर्वसामान्य कुटुंबांना दैनंदिन खर्चात कपात करावी लागत आहे. सणासुदीला कपडे, फराळ आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी अधिक पैसे खर्च करावे लागत असल्याने घरखर्चाचे नियोजन कठीण झाले आहे.
-----
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन घटले आहे. त्यात वाहतूक आणि हमालीचा खर्च वाढला आहे. घाऊक बाजारातूनच माल महाग मिळत असल्याने किरकोळ दर वाढवावे लागत आहेत.
-रामराव सोनटक्के, घाऊक विक्रेते
-----
दरवर्षी किमतीत थोडीफार वाढ होते; मात्र यंदा सुमारे ३० टक्क्यांपर्यंत दरवाढ झाली आहे. इंधन दरवाढीचाही थेट परिणाम जाणवत आहे. सरकारने तातडीने दर नियंत्रणात आणावेत; अन्यथा दिवाळीपर्यंत महागाई आणखी वाढण्याची भीती आहे.
-पांडुरंग बनसोडे, किरकोळ विक्रेते