गुंठेवारीला दोन महिन्यांची मुदतवाढ द्या

गुंठेवारीला दोन महिन्यांची मुदतवाढ द्या
Published on
गुंठेवारीला द्या दोन महिन्यांची मुदतवाढ! --- सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजप-शिवसेना नगरसेवकांची मागणी --- सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. १८ : शहरातील बेकायदा बांधकामे आणि भूखंड नियमित करून घेण्यासाठी महापालिकेने शुल्कात दिलेल्या सुटीमुळे मालमत्ताधारक गुंठेवारी कक्षात मोठी गर्दी करत आहेत. त्यामुळे भूखंड नियमित करण्यासाठी जाहीर केलेली ५० टक्के शुल्काची सूट आणखी दोन महिन्यांसाठी वाढवून द्यावी, अशी मागणी शुक्रवारी (ता. १८) झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजप-शिवसेना नगरसेवकांनी केली. ‘३० ऑक्टोबरपर्यंत गुंठेवारीची मुदत आहे, ती संपल्यानंतर यावर निर्णय घेऊ’, असे सांगत महापौर समीर राजूरकर यांनी यावर मार्ग काढला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवक राजू वैद्य यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. वैद्य म्हणाले, ‘खुल्या भूखंडासाठी बेटरमेंट शुल्कात दिलेल्या ५० टक्के सवलतीला संपताच एक महिन्याची मुदतवाढ महापौर राजूरकर यांनी दिली आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यासोबतच त्यांनी ही मुदत एक महिन्याची नव्हे, तर दोन महिन्यांची शेवटची मुदतवाढ म्हणून वाढवून द्यावी’, अशी मागणी केली. वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान म्हणाले, ‘विकास आराखड्यातील राखीव आणि शासकीय जागेवर अनेक वर्षांपासून नागरिक राहतात. त्यांनादेखील गुंठेवारीअंतर्गत घरे नियमित करून देण्याची संधी द्यावी, अशी मागणी अनेकदा केली आहे. मात्र, अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.’ नगरसेवक बाळासाहेब मुंडे यांनी सध्या एकाच बँकेत चलन भरण्याची सोय असल्याने नागरिकांची गर्दी होत असल्याचे सांगत, जास्तीत-जास्त बँकांमध्ये चलन भरण्याची सोय करून देण्याची मागणी केली. शिवसेनेचे गटनेते किशोर नागरे यांनी गुंठेवारी कक्षात कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली. त्यावर महापौर राजूरकर यांनी, ‘मुदतवाढीबाबत ३० ऑक्टोबरनंतर निर्णय घेतला जाईल आणि इतर अडचणीदेखील सोडवल्या जातील’, असे उत्तर दिले. --- १६ वा क्रमांक आल्याने अभिनंदन ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६’ मध्ये छत्रपती संभाजीनगर शहराचा देशात १६ वा क्रमांक आला आहे. यापूर्वी शहराचा ३४ वा क्रमांक होता. या प्रगतीबद्दल घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्यासह प्रशासनाचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव माजी महापौर रशीद मामू यांनी मांडला. त्याला राजू वैद्य, किशोर नागरे आणि सभागृहनेते गोविंद केंद्रे यांनी अनुमोदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com