ABD26J82432
पानकनेरगाव ः मुकुल हांडेकर यांच्या पुढाकारातून ‘ज्ञानकुंज’ ग्रंथालयास पुस्तकांची भेट देण्यात आली.
-----------------
‘ज्ञानकुंज’ ग्रंथालयाला पुस्तकांची भेट
--------------
सेनगाव, ता. ३१ (बातमीदार) : आपण ज्या शाळेत शिकलो, ज्या शाळेने आयुष्याला दिशा दिली, त्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पानकनेरगाव येथील माजी विद्यार्थी तथा पोलिस पाटील मुकुल रमेश हांडेकर यांनी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांनी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील ‘ज्ञानकुंज’ ग्रंथालयास पुस्तकांची भेट दिली. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
मनोगत व्यक्त करताना मुकुल हांडेकर म्हणाले, याच शाळेत शिक्षण घेतल्यामुळे आपल्या जडणघडणीत या शाळेचे मोठे योगदान आहे. त्या ऋणाची जाणीव ठेवून शाळेसाठी काहीतरी योगदान द्यावे, या भावनेतून पुस्तक भेटीचा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना अभ्यासक्रमाबाहेरील ज्ञान मिळावे आणि ग्रंथालय अधिक समृद्ध व्हावे, हा यामागील उद्देश आहे. गावातील नागरिक आणि माजी विद्यार्थ्यांनीही ‘ज्ञानकुंज’ ग्रंथालयासाठी पुस्तके भेट देऊन या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी मुख्याध्यापक अनिल देशमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रामप्रसाद खेडेकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.