esakal | महाराष्ट्रातून ११ हजार भाविक जाणार हजला 
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्रातून ११ हजार भाविक जाणार हजला 

मराठवाड्यातील भाविक जुलैच्या पहिल्या आठवड्यात हजसाठी रवाना होण्याची शक्यता आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हजची प्रक्रिया पार पाडायच्या प्रक्रियेला प्रारंभ होईल. मराठवाड्यातील भाविकांना औरंगाबाद आणि मुंबई विमानतळाचा पर्याय असल्याने अनेक जण मुंबईला जाऊन तेथून हजला रवाना होतील. ज्यांनी औरंगाबादचा पर्याय निवडला ते भाविक औरंगाबाद विमानतळावरून रवाना होतील.

महाराष्ट्रातून ११ हजार भाविक जाणार हजला 

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य हज समितीमार्फत यावर्षी राज्यातून जवळपास ११ हजार भाविक हजला जाणार आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यातील भाविक हजला रवाना होण्याची शक्यता असून भाविकांसाठी मुंबई, औरंगाबाद, नागपूर येथून थेट विमानाची सुविधा आहे.

महाराष्ट्र राज्य हज समितीकडे इच्छुक भाविकांचे अर्ज आल्यानंतर त्यांची सोडत काढण्यात आली होती. त्यानंतर ११ हजारांपेक्षा जास्त भाविक महाराष्ट्रातून हजला जाणार आहेत. हजला जाणाऱ्या भाविकांसाठी आता कोणत्या एअरपोर्टवरून जायचे यासाठी पर्याय देण्यात आलेले आहेत. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांतील भाविकांना हैदराबाद आणि मुंबई विमानतळ, तर जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि नगर येथील भाविकांसाठी औरंगाबाद आणि मुंबई अशा दोन विमानतळांचे पर्याय आहेत. यामध्ये बहुतांश जण हे मुंबई विमानतळाचा पर्याय निवडताना दिसत आहेत.

हेही वाचा - कोरोनाची धास्तीः नाथषष्ठी च्याबाबतीत मोठा निर्णय

औरंगाबाद विमानतळाऐवजी मुंबई विमानतळावरून भाविक हजला रवाना झाले तर त्यांना ३७ हजार रुपये कमी खर्च येत असल्याने अनेकांची मुंबई विमानतळाला पसंती आहे. 
हजला जाणाऱ्या दोन कॅटेगिरीमधील भाविकांना वेगवेगळी रक्कम भरावी लागते. जे भाविक अजिजिया कॅटेगिरीत आहे त्यांना २ लाख ६५ हजार तर ग्रीन कॅटेगिरीतील भाविकांना ३ लाख १० हजार रुपये हे मुंबई विमानतळावरून लागण्याची शक्यता आहे. हेच भाविक जर औरंगाबाद विमानतळावरून रवाना झाले तर त्यांना ३७ हजार रुपये अतिरिक्त खर्च येईल. ज्या भाविकांचा हजसाठी नंबर लागला आहे त्या भाविकांनी ८१ हजार पहिला, तर १ लाख २० हजारांचा दुसरा हप्ता हज समितीच्या खात्यात जमा केला आहे. आता सौदी चलन रियाल, विमान प्रवास आणि इतर खर्च गृहीत धरून भाविकांना तिसरा हप्ता जमा करावा लागणार आहे.

मराठवाड्यातील भाविक जुलैत रवाना होण्याची शक्यता

मराठवाड्यातील भाविक जुलैच्या पहिल्या आठवड्यात हजसाठी रवाना होण्याची शक्यता आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हजची प्रक्रिया पार पाडायच्या प्रक्रियेला प्रारंभ होईल. मराठवाड्यातील भाविकांना औरंगाबाद आणि मुंबई विमानतळाचा पर्याय असल्याने अनेक जण मुंबईला जाऊन तेथून हजला रवाना होतील. ज्यांनी औरंगाबादचा पर्याय निवडला ते भाविक औरंगाबाद विमानतळावरून रवाना होतील. सोडतीत औरंगाबादच्या जवळपास ८०८ भाविकांचा नंबर लागला आहे. प्रतीक्षा यादीतून यात आणखी काही जणांचा नंबर लागू शकतो. 

पाच एप्रिलपासून प्रशिक्षण 

हजला जाणाऱ्या भाविकांना यंदाही खिदमाते हुज्जाज समितीच्या माध्यमातून जामा मशिदीच्या सईद हॉलमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिले प्रशिक्षण ५ एप्रिल, दुसरे १२ एप्रिल, तिसरे १९ एप्रिल, चौथे ३१ मे, तर १३ आणि १४ मे रोजी दोनदिवसीय अंतिम प्रशिक्षण होणार आहे. यामध्ये हजला जाण्यासाठी काय काळजी घ्यावी लागते, तेथे काय करावे लागते, असे सर्व मुद्दे सविस्तर सांगितले जातात. 

हजवर कोरोनाचा परिणाम नाही 

सौदी अरेबिया सरकारने कोरोनामुळे खबरदारीचे उपाय म्हणून ‘उमराह’च्या बाबतीत प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या आहेत. मात्र, हजसाठी जुलै-ऑगस्टपर्यंतचा कालावधी असल्याने हज यात्रेवर कोरोनाचा कोणताही परिणाम होणार नाही, त्यादृष्टीने प्रशासनाकडून पुढील आखणी केली जात आहे. 
 

loading image