तृतीया-चतुर्थीचा एकाच दिवशी योग

तृतीया-चतुर्थीचा एकाच दिवशी योग
Published on
३१ वर्षांनंतर तृतीया-चतुर्थीचा एकाच दिवशी योग -- हरतालिकेनंतरच गणरायाचे आगमन; पूजेचे मुहूर्त निश्चित -- सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर,ता. १० ः श्रावण महिना संपताच गणेशोत्सवाचे वेध लागतात. यंदा मात्र गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येणारी हरतालिका तृतीया आणि गणेश चतुर्थीच्या तिथीचा काही काळ एकाच दिवशी येत असल्याने महिला व गणेशभक्तांमध्ये पूजेच्या क्रमाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पंचांगानुसार, १४ सप्टेंबरला सकाळी हरतालिकेची पूजा करून त्यानंतर गणरायाची स्थापना करता येणार आहे. हरतालिका तृतीयेच्या दिवशी विवाहित महिला तसेच विवाहेच्छुक मुली भगवान शंकर आणि माता पार्वतीची आराधना करून उपवास करतात. यंदा तृतीया तिथी १३ सप्टेंबरला सकाळी ७.०८ वाजता सुरू होऊन १४ सप्टेंबरला सकाळी ७.०६ वाजता संपणार आहे. त्यामुळे हरतालिकेची पूजा तृतीया तिथीतच करणे महत्त्वाचे मानले जाते. -- सकाळी पूजेचा मुहूर्त हरतालिका पूजेसाठी सकाळी ६.२२ ते ७.०६ हा कालावधी शुभ मानला जात आहे. ब्रह्म मुहूर्तापासून सकाळी ७.०६ पर्यंतही पूजा करता येईल. तसेच स्थानिक पंचांगानुसार राहुकाळ वर्ज्य करून दुपारी २ पर्यंत पूजा करण्याची मुभा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे महिलांनी आपापल्या परंपरेनुसार आणि स्थानिक पुरोहितांच्या मार्गदर्शनानुसार पूजेची वेळ निश्चित करावी. -- सकाळी ११.१६ नंतर गणेश स्थापना हरतालिकेची पूजा झाल्यानंतर गणेश चतुर्थीची पूजा व गणपतीची स्थापना करता येणार आहे. वैदिक पंचांगानुसार यंदा गणेश स्थापनेसाठी सकाळी ११.१६ ते दुपारी १.४४ हा शुभ काळ देण्यात आला आहे. पंचांगानुसार शहर व स्थानानुसार मुहूर्तात काही मिनिटांचा फरक असू शकतो. -- उपवास सोडण्याची वेळ हरतालिकेचा उपवास करणाऱ्या महिलांनी दिवसभर उपवास ठेवावा. १४ सप्टेंबरला सकाळी स्नान करून हरतालिकेची उत्तरपूजा केल्यानंतर उपवास सोडता येईल. प्रथम देवाला नैवेद्य दाखवून पाणी किंवा तीर्थ घ्यावे. त्यानंतर दूध, फळे, खीर अथवा उपवासाचे पदार्थ घ्यावेत. निर्जला उपवास असल्यास लगेच जड आहार घेण्याऐवजी प्रथम पाणी आणि हलका आहार घेणे योग्य ठरेल. -- ((कोट)) यंदा हरितालिका पूजनाला अधिक महत्त्व दरवर्षी गणेशोत्सवाच्या आरंभी एक दिवस अगोदर हरितालिका पूजन महिला व तरुणी करीत असतात. मात्र, यंदा एकाच दिवशी हरितालिका पूजा व गणपती मूर्तीची स्थापना करावी लागणार आहे. यापूर्वी तृतीयायुक्त चतुर्थीचा योग २९ ऑगस्ट १९९५ रोजी आला होता. त्यानंतर ३१ वर्षांनी हरितालिका पूजन व गणेश चतुर्थी यंदाच एकाच दिवशी आली आहे. त्यात यंदा सोमवार आहे. सोमवार भगवान शंकराचा वार मानला जातो. यामुळे हरितालिका पूजनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. - सुरेश केदारे गुरुजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com