
Aurangabad : तिशीपासूनच हृदयाला ठेवा हेल्दी
औरंगाबाद : कोरोनानंतर हृदयरोगाच्या रुग्णांमध्ये जवळपास वीस ते पंचवीस टक्क्यांची वाढ झाली. बदलत्या जीवनशैलीमुळे आता हृदयरोगाचे स्वरूपही बदलत आहे. अगदी वयाच्या ८ ते १० व्या वर्षापासूनच रक्तवाहिन्यामध्ये कॅल्शिअम दिसायला सुरुवात होत असल्याचीही काही उदाहरणे आहेत. वयाच्या तिशीत तर ब्लॉकेज निर्माण होऊन हृदयविकाराचा धक्का येत असल्याच्या केसेसही येऊ लागल्यात. त्यामुळे पालकांनी स्वतःसह लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक बनले आहे.
हृदयरोगाचे कोरोनापूर्वी प्रमाण केवळ पाच ते दहा टक्के होते. आता ते २० ते २५ टक्क्यांवर गेले आहे. यासाठी खाण्या-पिण्याच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव या दोन गोष्टीही कारणीभूत असल्याचे हृदयरोगतज्ज्ञांनी सांगितले. शहरातील भावसिंगपुरा येथील ३२ वर्षीय तरुणाला रक्तवाहिन्यांत गाठी झाल्याने हृदयरोगाचा धक्का आला होता. त्यावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करीत जीवदान दिले. या तरुणाला दोन वर्षांपूर्वी म्हणजेच वयाच्या तिसाव्या वर्षीही असाच धक्का आला होता. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला व्यसन न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्याने तो ऐकला नाही. केवळ निष्काळजीपणा आणि आम्हाला काही होत नाही, या भ्रमामुळे तरुणाईमधील हृदयविकाराचे प्रमाण वाढल्याचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. योगेश बेलापूरकर यांनी सांगितले.
कोरोनाने घातली हृदयरोगात भर
कोरोना हा आजार फुप्फुसाचा जरी असला तरी रक्तवाहिन्यांमध्ये गाठी होणे, हा प्रकार कोरोनात खूप होता. यात मेंदू, आतड्याला सूज आणि हृदयातील रक्तावाहिन्यात गाठी होण्याचे प्रमाण असल्याने कोरोनाच्या काळात हृदयविकाराचे प्रमाण वाढले होते. कोरोनातून बरे झालेल्यांना अजूनही दुष्परिणाम जाणवतात. कोरोनाचा शरीरातील लहान रक्तवाहिन्यावर परिणाम झाला आहे. अजून काही वर्षे याचा त्रास राहील. यामुळे असा त्रास असणाऱ्यांनी नियमित तपासण्या करणे गरजेचे आहे. त्यातही ज्यांनी कोरोना काळात विशिष्ट इंजेक्शन घेतले त्यांनी हृदयासंदर्भातील तपासण्या नियमित कराव्यात. त्या दर सहा महिन्याला पुढील दोन ते तीन वर्षे केल्यास त्यांना हृदयाच्या त्रासापासून बचाव करू शकता येईल, असे डॉ. बेलापूरकर यांचे मत आहे.
हृदयविकाराची कारणे
जीवनशैलीतील बदल
रात्री उशिरा झोपणे
झोप पुरेशी न होणे
सकस आहाराचा अभाव
व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा
अतिताणतणाव
धूम्रपान व मद्यपान
हे करा नियमित व्यायाम, योगा, चालणे, सायकलिंग, पळणे, पोहणे, ॲरोबिक व्यायाम केल्याने शरीर सुदृढ राहते. तसेच आहारामध्ये फळे, भाजीपाला, दूध किंवा दही, सुकामेवा, तूप आदींचे सेवन करावे. खाद्यतेल डबल फिल्टरऐवजी साधे किंवा घाण्याच्या तेलाचा वापर करावा. दर महिन्याला सूर्यफूल, करडई, शेंगदाणा असे खाद्यतेल बदलत राहावे.
वजन वाढू देऊ नका
उद्योग-व्यवसाय, नोकरी करणाऱ्या तरुणांनी आरोग्याचा विषय गांभीर्याने घेत नियमित वैद्यकीय तपासणी करावी. विशेष करून, वजन वाढू देऊन नये. तीस वर्षांपुढील तरुणांनी दर दोन वर्षांनी तपासणी करावी, तर चाळीशी पार केलेल्यांनी दरवर्षी आणि पन्नाशीनंतर दर सहा महिन्याला तपासण्या करणे गरजेचे आहे. त्यातूनच मोठे आजार वेळीच रोखू शकतो.