दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना लाखाची मदत द्या
-----
काँग्रेसचा औंढा तहसीलवर मोर्चा; पीकविमा, चारा छावण्यांचीही मागणी
----
हिंगोली, ता. १९ (बातमीदार) : औंढा नागनाथ तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, पीकविम्याची अग्रिम रक्कम तातडीने वितरित करावी आणि गरजू गावांमध्ये चारा छावण्या सुरू कराव्यात, या मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने औंढा नागनाथ तहसील कार्यालयावर सोमवारी (ता. १९) मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. तसेच ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली.
नैसर्गिक संकटे, पिकांचे नुकसान व शेतीच्या वाढत्या खर्चामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह व दिवाळी सण साजरा करताना शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत दिवाळीपूर्वी प्रत्येकी एक लाख रुपये जमा करावेत, अशी मागणी काँग्रेसने केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची अग्रिम रक्कम तातडीने द्यावी. तसेच पशुधनासाठी चारा व पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करून गरज असलेल्या गावांमध्ये चारा छावण्या सुरू कराव्यात, असे निवेदनात नमूद केले आहे.
या मोर्चात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश पाचपुते, माजी जिल्हाध्यक्ष जक्की कुरेशी, प्रदेश सचिव साहेबराव देवकते, डाॅ. रमेश शिंदे, तालुकाध्यक्ष ॲड. प्रदीप पोले, माणिकराव पाटील, साहेबराव नाईक, किसनराव जुमडे, भास्कर पोले, नंदकुमार पाटील, शेख शकील, सचिन सोळंके, शेख बुऱ्हाण, सतीश पाटील, रशीद कुरेशी, लक्ष्मण खोकले, बबन डुकरे, केशव पोले, अनिल पोटी, शेख नजीम, विठ्ठल वागतकर आदी सहभागी झाले होते. यादरम्यान पोलिस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक शेख आयुब, ज्ञानेश्वर सावळे, अमोल चव्हाण यांनी बंदोबस्त ठेवला होता.