अतिजोखमीच्या गरोदर मातांना विशेष प्रसूतीपूर्व आरोग्य सेवांचा लाभ
लातूर, ता. १३ : जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. अभियानाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून जिल्ह्यातील अतिजोखमीच्या गरोदर मातांसाठी विशेष प्रसूतीपूर्व तपासणी (एएनसी) व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून अतिजोखमीच्या गरोदर मातांचे लवकरात लवकर निदान करून त्यांच्या नियमित व विशेष प्रसूतीपूर्व तपासण्या करण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने रक्तदाब, हिमोग्लोबीन, रक्तशर्करा यांसारख्या आवश्यक वैद्यकीय चाचण्या, मोफत औषधोपचार आणि पोषणविषयक सखोल समुपदेशन केले जात आहे. तसेच, गर्भाच्या वाढीचे नियमित निरीक्षण करणे, प्रसूतीची अपेक्षित तारीख लक्षात घेऊन प्रसूतीचे योग्य ठिकाण निश्चित करणे आणि सुरक्षित संस्थात्मक प्रसूतीबाबत गरोदर माता व त्यांच्या कुटुंबीयांना मार्गदर्शन केले जात आहे. अभियानातील आरोग्य सेवांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी मंगळवारी निलंगा तालुक्यातील मदनसुरी, रामलिंग (मु), कासार बालकुंदा, हलगरा व अंबुलगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष भेट दिली. सेवा संकल्प अभियानाच्या उर्वरित कालावधीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरोदर मातांनी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन नियमित प्रसूतीपूर्व तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले आहे. तसेच गरोदरपणात अचानक रक्तस्त्राव होणे, पोटात तीव्र वेदना होणे अथवा हात-पाय आणि चेहऱ्यावर सूज येणे यासारखी कोणतीही धोक्याची लक्षणे दिसून आल्यास अजिबात दुर्लक्ष न करता आशा सेविका व आरोग्य सेविकांच्या सल्ल्याने तत्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.