महामार्गावरील अतिक्रमणाविरोधात एल्गार
----
किनवटमध्ये दोन ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा
---
गोकुंदा, ता.१५ (बातमीदार) : किनवट शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१-ए वरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गावरील अतिक्रमणे तातडीने हटवून रस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग १६१-ए रस्ता रुंदीकरण संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित अतिक्रमणे तातडीने हटविण्यात आली नाहीत, तर २ ऑक्टोबर २०२६ रोजी संबंधित कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा समितीने किनवटच्या सहायक जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
समितीच्या निवेदनानुसार, सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन तसेच जिल्हाधिकारी, नांदेड यांनी राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्याबाबत यापूर्वी निर्देश दिले आहेत. मराठवाडा विभागात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असतानाही किनवट शहर आणि तालुक्यात अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही प्रभावीपणे झालेली नसल्याचा आरोप समितीने केला आहे. किनवट शहरातील काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागापासून निर्धारित अंतर न सोडता बांधकामे करण्यात आली असून, काही ठिकाणी बसथांब्यालगतही अतिक्रमण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाल्याचे समितीचे म्हणणे आहे.
------
नियमांचे उल्लंघन
शहरातील क्रीडा संकुल, तहसील कार्यालय, दिवाणी न्यायालय, जिल्हा परिषद व्यापारी संकुल आदी ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागापासून १८ मीटर अंतर सोडून बांधकाम करण्याचे निकष असतानाही त्याचे उल्लंघन झाल्याचा दावा संघर्ष समितीने केला आहे. सर्वोच्च न्यायालय आणि शासनाच्या निर्देशानुसार महामार्गावरील अतिक्रमणे तातडीने हटवून राष्ट्रीय महामार्ग मोकळा करावा. अन्यथा २ ऑक्टोबरपासून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय महामार्ग १६१-ए रस्ता रुंदीकरण संघर्ष समितीने दिला आहे.