खुलताबाद ः येथील चिश्तीया महाविद्यालय, खुलताबाद येथे मंगळवारी (ता.१५)आजीवन शिक्षण व विस्तार विभाग आणि हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास महाराष्ट्र बँक, खुलताबाद शाखेचे प्रबंधक कुशल जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सय्यद आसिफ झकेरिया होते. व्यासपीठावर डॉ. सय्यद इक्बाल मजाज, डॉ. रुबीना खान आणि डॉ. मोहम्मद अली उपस्थित होते.
यावेळी डॉ. सय्यदा अर्शिया कादरी, डॉ. सुभाष बागल, डॉ. अफरोजा खातून, डॉ. पुरुषोत्तम रामटेके आणि प्रा. शफी मौलाना यांनी हिंदी भाषेविषयी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे कुशल जाधव यांनी हिंदी भाषेचे महत्त्व अधोरेखित करताना बँकिंग क्षेत्रातही हिंदी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सय्यद आसिफ झकेरिया यांनी हिंदी भाषेच्या समृद्ध इतिहासावर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यानंतर देशातील नागरिकांना एका भाषेच्या माध्यमातून जोडणे महत्त्वाचे होते. त्या काळात हिंदी भाषेला महत्त्वाचे स्थान देण्यात आले. दूरदर्शनवर ‘महाभारत’ मालिकेचे हिंदीतून प्रसारण झाल्याने हिंदी भाषेचा प्रसार आणि प्रभाव अधिक व्यापक झाल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘प्रयासपत्रक’चे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. हिंदी विभाग आणि आजीवन शिक्षण व विस्तार विभागाच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच तासिका तत्त्वावर महाविद्यालयात रुजू झालेल्या प्राध्यापकांचा परिचय करून देत त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सैफ जैदी यांनी केले. प्रास्ताविक डॉ. सय्यद इक्बाल मजाज यांनी केले, तर आभार प्रा. अजमत शेख यांनी मानले. यशस्वितेसाठी प्रा. सुनील जाधव, डॉ. आसाराम पवार, डॉ. मोहम्मद मुजाहेद उर रहमान आणि प्रा. शफी मौलाना यांनी परिश्रम घेतले.