ABD26J82972
हिंगोली ः उपलब्ध पाणीसाठ्याचा जपून वापर करत शेतकरी पिकांचे संगोपन करीत आहेत. हिंगोली तालुक्यातील लोहगाव शिवारात शेतकरी अजय बियाणी यांनीही जेमतेम उपलब्ध पाण्यावर हळदीचे पीक जोपासले आहे.
-----
हळदीसाठी पाण्याचे सूक्ष्म नियोजन
-
एकरी लाखाचा खर्च, तर दुसरीकडे पिके करपण्याची भीती
हिंगोली, ता. ९ : यंदा पावसाने सुरवातीपासूनच ओढ दिल्याने हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर पिके जगविण्याचे अभूतपूर्व आव्हान उभे ठाकले आहे. मोसमात अत्यल्प पाऊस झाल्याने अनेक भागांत भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, याचा थेट फटका नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीला बसत आहे. जास्त पाण्याची गरज असणाऱ्या या पिकाला वाचविताना बळिराजाची अक्षरशः दमछाक होत आहे.
हळद हे दीर्घ कालावधीचे पीक असल्याने कंद फुगवणीच्या आणि वाढीच्या काळात नियमित पाण्याची आवश्यकता असते. मात्र, परतीचा पाऊसही न झाल्याने जिल्ह्यातील विहिरींनी तळ गाठला असून बोअरवेल कोरडे पडू लागले आहेत. अशा अत्यंत प्रतिकूल स्थितीतही हिंगोली तालुक्यातील लोहगाव शिवारातील शेतकरी अजय बियाणी यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि उपलब्ध पाण्याचा अपव्यय टाळत, काटेकोर नियोजनाच्या जोरावर आपली दहा एकरांतील हळद समर्थपणे जोपासली आहे. मात्र, सर्वांकडेच पाण्याची अशी व्यवस्था नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. एकीकडे मजुरी, खते आणि मशागतीचा खर्च गगनाला भिडला असताना, दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. वर्षभराचे भांडवल अडकल्याने शेतकरीवर्ग सध्या हवालदिल झाला असून, उपलब्ध पाण्याच्या थेंबाथेंबावर पिके वाचविण्याची धडपड सुरू आहे.
चौकट
जिल्ह्यात ३८ हजार हेक्टरवर पेरा
हिंगोली जिल्ह्यात यंदा ३८ हजार ६४८ हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड नोंदवली गेली आहे. सुरवातीचा खर्च जास्त असला तरी इतर पारंपरिक पिकांपेक्षा अधिक नफा मिळवून देणारे पीक म्हणून गेल्या चार-पाच वर्षांत शेतकऱ्यांचा ओढा हळदीकडे लक्षणीय वाढला. मात्र, यंदाच्या तीव्र पाणीटंचाईमुळे ऐन भरात आलेली हळद अनेक भागांत पानांवरून सुकू लागली आहे. पाणीटंचाई अशीच कायम राहिल्यास यंदा हळदीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस अत्यंत तोकडा झाला. विहिरींमध्ये अपेक्षित जलसाठा तयार होऊ शकला नाही आणि भूजल पातळीही कमालीची खालावली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या जेमतेम पाण्यावर ठिबक व इतर उपायांचा वापर करून आम्ही हळद वाचवत आहोत. पाण्याचे सूक्ष्म नियोजन हाच आता एकमेव पर्याय उरला आहे.
- अजय बियाणी,
शेतकरी तथा व्यावसायिक, लोहगाव
-------
हळदीच्या पिकावर आतापर्यंत एकरी किमान एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च झाला आहे. मात्र, आता विहिरी आटल्या असून बोअरवेलनेही पाणी देणे बंद केले आहे. डोळ्यादेखत संपूर्ण पीक करपून जाण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत नफा तर सोडाच, पण केलेला खर्चही वसूल होईल की नाही, अशी चिंता लागली आहे.
- पिराजी घुगे,
शेतकरी