ABD26J83307, ABD26J83308
हिंगोली : जवाहर रोड भागातील एका बँक शाखेसमोर रस्त्यावरच दुचाकी अशा उभ्या केल्या जात असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होतो. (दुसऱ्या छायाचित्रात) पोस्ट आफिस कार्यालयापासून रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर दोन राष्ट्रीसीकृत बँकेच्या शाखा आहेत. परंतु, वाहनतळाची व्यवस्था नसल्याने खातेदारांना आपली वाहने नाईलाजास्तव अशी रस्त्यावर उभी करावी लागत आहेत.
-------
बँकांच्या शाखा थाटात; वाहनतळ मात्र कागदावर!
--------
हिंगोलीच्या मुख्य बाजारपेठेत २० ते ३० बँक शाखा; खातेदारांसह कर्मचाऱ्यांची वाहनेही रस्त्यावर
--
हिंगोली, ता. १७ : शहरातील मुख्य बाजारपेठेत राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि खासगी बँकांच्या शाखांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या बँकांमध्ये येणाऱ्या खातेदारांसह बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था कागदावरच असल्याने वाहनतळाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बँकांच्या शाखा थाटल्या जात असताना वाहनतळाच्या सुविधेकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे चित्र हिंगोली शहरात पाहायला मिळत आहे.
शहरातील इंदिरा गांधी चौक ते महात्मा गांधी चौक, जवाहर रोड, पोस्ट ऑफिस रोड, रेल्वेस्टेशन रोड, नांदेड नाका ते शिवाजीनगर तसेच नारायणनगर परिसरात राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि खासगी बँकांच्या जवळपास २० ते ३० शाखा कार्यरत आहेत. याशिवाय विविध फायनान्स कंपन्यांची कार्यालयेही या भागात थाटण्यात आली आहेत. या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने खातेदार आर्थिक व्यवहारांसाठी ये-जा करतात. मात्र, बहुतांश बँकांकडे वाहनतळाची व्यवस्था नसल्याने ग्राहकांना आपली वाहने उभी करण्यासाठी जागा शोधावी लागते. अनेकजण नाइलाजाने रस्त्याच्या कडेला किंवा दुकानांसमोर वाहने उभी करतात. परिणामी, आधीच वर्दळीच्या असलेल्या बाजारपेठेतील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. पादचारी आणि इतर वाहनधारकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो.
-------
जागामालक भाडे घेऊन मोकळे
शहरातील बहुतांश बँक शाखा या भाड्याच्या इमारतींमध्ये सुरू आहेत. त्यासाठी संबंधित जागामालकांकडून दरमहा २० हजारांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत भाडे आकारले जाते. मात्र, एवढे मोठे भाडे देऊनही बँकांना वाहनतळासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. जागामालक भाडे घेण्यापुरतेच मर्यादित राहत असल्याने पार्किंगचा प्रश्न कायम आहे.
--------
बँक प्रशासनाचेही दुर्लक्ष
नवीन शाखा सुरू करताना अधिकारी, कर्मचारी आणि खातेदारांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करणे आवश्यक आहे. मात्र, अनेक बँकांकडून या सुविधेकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी, बँकेतील व्यवहारांसाठी येणाऱ्या नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना वाहने रस्त्यावर उभी करण्याची वेळ येत आहे. शहरातील वाढती वाहनसंख्या आणि बाजारपेठेतील गर्दी लक्षात घेता बँक प्रशासनासह संबंधित यंत्रणांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पार्किंगची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
-------
खातेदारांना दंडात्मक कारवाईचा भुर्दंड
बाजारपेठेत बँक शाखांसमोरील रस्त्यावर उभ्या दुचाकी, चारचाकी वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न नेहमीचाच झाला आहे. अशावेळी वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारल्या गेला, तर खातेदारांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. अशावेळी मात्र बँक प्रशासन जबाबदार झटकण्यात पुढे असते. यावरून खातेदारांतही नेहमीच नाराजीच सूर उमटत असतो.
------
((कोट))
शहरातील कुठल्याही बँक शाखेत जायचे झाल्यास ते वाहन कुठे उभे करावे? हा प्रश्न नेहमीच पडतो. काहीवेळा नाईलाजास्तव दूर कुठे तरी गल्लीत वाहन उभे करून मग शाखेत यावे लागले, तर काहीवेळा रस्त्यावर वाहन उभे केले म्हणून पोलिसांच्या दंडात्मक करवाईला सामोरे जावे लागते. याकरिता बँकांनी आपले कर्मचारी, खातेदारांच्या वाहनांकरीत स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उपलब्ध करणे गरजेचे आहे.
- सुभाष बोरकर, खातेदार
-------
((कोट))
प्रत्येक वाहनधारकाने वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. शहरात कुठेही रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक शाखेकडून नेहमीच सूचना, कारवाई केली जाते. बँकांनीही आपल्या शाखेत येणाऱ्या खातेदारांची वाहने रस्त्यावर उभी राहणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. हिंगोली शहरात नियम डावलणाऱ्यांसह रस्त्यावर वाहने उभी करून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे.
- गफार शेख, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा
------
बँका पाहतात स्वतःचे हित
किरायाच्या इमारतीत बँक शाखा सुरू करताना सर्व बाबींचा विचार करण्यात येतो. यामध्ये कर्मचारी आणि खातेदारांच्या वाहनांसाठी पार्किंग आवश्यक असतेच. परंतु, काहीवेळा जिथे जागा मोक्याची असते, तेथे पार्किंग किंवा एखादी दुसरी सुविधा नसते. अशावेळी बँक शाखेचे हित पाहता त्या जागेत शाखा सुरू केली जाते, अशी प्रतिक्रिया एक बँक अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली.