फोटोओळी :
हिंगोली ः हिंगोली जिल्हा न्यायालय परिसरात कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काळ्या फिती लावून आंदोलन केले.
------
समान काम, समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन
हिंगोली, ता.१६ : समान काम, समान वेतनाची मागणी करत न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता.१६) जिल्हा न्यायालयाच्या आवारात काळ्या फिती लावून आंदोलन केले. मुंबई उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुधारित वेतनवाढीप्रमाणे जिल्हा न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
न्यायालयीन कर्मचाऱ्यांकडून समान काम, समान वेतनाची मागणी करण्यात येत आहे. परंतु, मागणी मान्य झाली नसल्याने कर्मचाऱ्यांनी विविध टप्प्यांत आंदोलनाचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी जिल्हा न्यायालय इमारतीच्या प्रांगणात काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढीचा लाभ देण्यात आला आहे. त्या धर्तीवर राज्यातील सर्व न्यायलायातील कर्मचाऱ्यांनाही वेतनवाढ लागू करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली. यावेळी न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात १७ ऑक्टोबरला काळ्या फिती आंदोलन केले जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात ५ नोव्हेंबर राजी राज्यातील सर्व न्यायालयीन कर्मचारी एकदिवसीय सामूहीक रजा आंदोलन पुकारणार आहेत तर चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात १७ नोव्हेंबरपासून कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे (गट-क) जिल्हाध्यक्ष सतीश देशमुख यांनी सांगितले.