जिल्ह्यात ९५ टक्के पीक पंचनामे पूर्ण
----
३ लाख ६५ हजार हेक्टरवरील खरिप पिकांचे नुकसान
----
हिंगोली, ता. १७ (बातमीदार) : यंदा पावसाने सुरवातीपासूनच पाठ फिरविल्याने हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण खरीप हंगाम संकटात सापडला आहे. दरम्यान, महसूल व कृषी विभागाने शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीचे सर्वेक्षण केले असून, जिल्ह्यातील सुमारे ९५ टक्के पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले आहे. आता शेतकऱ्यांचे डोळे शासनाकडून मिळणाऱ्या तातडीच्या आर्थिक मदतीकडे लागले आहेत.
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा तब्बल ३० टक्क्यांनी घटल्याने सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, उत्पादनातून लागवडीचा खर्च निघणेही कठीण झाले आहे. जिल्ह्यात यंदा तीन लाख ९० हजार ६१९ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. त्यापैकी तब्बल तीन लाख ६५ हजार हेक्टरवरील बाधित पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या; मात्र नंतर पावसाने प्रदीर्घ खंड दिल्याने पिकांची वाढ खुंटली. सोयाबीनसह आता नगदी पीक असलेली हळद आणि ऊस उत्पादक शेतकरीही हवालदिल झाले आहेत. पंचनाम्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोचल्याने प्रशासनाने तातडीने भरपाईची रक्कम खात्यावर जमा करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
---
हेक्टरी एक लाख मदतीची मागणी
वाढता खते-बियाण्यांचा खर्च, मजुरी व अत्यल्प उत्पादन यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. तोंडावर सणासुदीचे दिवस असताना खिशात छदामही नसल्याने दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने हेक्टरी किमान एक लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. पंचनामे आटोपल्यानंतर आता शासन प्रत्यक्ष निधी कधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.