जिल्हा परिषदेतील प्रलंबित
प्रकरणांचा होणार निपटारा
--
हिंगोली, ता. ४ : जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी विभागप्रमुखांना दिले. तसेच दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासह ई-फाइल्स प्रणालीचा प्रभावी वापर करण्यावर भर द्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (ता. तीन) जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी प्रशासकीय कामे विहित वेळेत पूर्ण करण्याबाबत विभागप्रमुखांना सूचना देण्यात आल्या. दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत अदा करावे, तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत जमा करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या. शासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फाईल्सचा निपटारा जलद गतीने करण्यासाठी ई-फाइल्स प्रणालीवर विशेष भर देण्याचे निर्देशही देण्यात आले.
आपले सरकार पोर्टलवर नागरिकांकडून प्राप्त होणारे अर्ज आणि तक्रारींचा विहित मुदतीत निपटारा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यासोबतच लोकायुक्त प्रकरणे आणि न्यायालयीन प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या तक्रारी तसेच विविध शासकीय स्तरावरील प्रकरणांचे वेळेत निवारण करण्याचे निर्देश गायकवाड यांनी दिले.
बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे, केशव गड्डापोड आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.