ABD26J80641
कुपटी (ता. वसमत जि. हिंगोली) ः भूकंपाच्या धक्क्यांमुळे सुनील बर्गे यांच्या घरास गेलेले तडे.
--------------
हिंगोली जिल्हा भूकंपाने पुन्हा हादरला
---------------
-केंद्रबिंदू गडाळा (ता. औंढा), पांगरा शिंदे (ता. वसमत) येथे
-अनेक घरांच्या भिंतींनाही तडे, नागरिक भीतीने घराबाहेर
हिंगोली, ता. ३ (बातमीदार)ः भूकंपाच्या एकापाठोपाठ दोन धक्के व तीनवेळा भूगर्भातील आवाजाने शनिवारी (ता. तीन) सकाळी जिल्हा पुन्हा हादरला. सकाळी ७ः४७ वाजता बसलेल्या पहिल्या धक्क्याची नोंद ३.३ रिश्टर स्केल नोंदवली. केंद्रबिंदू गडाळा येथे (ता. औंढा नागनाथ) येथे तर दुसरा धक्का ९.४३ वाजता बसला त्याची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल एवढी होती तर केंद्रबिंदू पांगरा शिंदे परिसर (ता.वसमत) येथे असल्याचे समोर आले. यामुळे अनेक ठिकाणी घराच्या भिंतीना तडे गेले.
आपत्कालीन यंत्रणा कडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कुठेही वित्त आणि किंवा जीवित हानी झाली नाही. मात्र नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण आहे. हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. गुरुवारी (ता.एक) रात्री ९.४१ वाजता वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात भूगर्भातून आवाजासह जमिनीस धक्का बसला होता. त्यानंतर शनिवारी (ता.तीन) ४८ तासांच्या आत दोन धक्क्यांनी जिल्हा हादरला. यावेळी भूगर्भातून भीषण गळगळात व खळखळाट असा आवाज आला. घरातील भांडी आणि इतर साहित्य हलल्याने घाबरलेल्या नागरिकांनी लहान मुले, वयोवृद्धांसह घराबाहेर पडत मोकळ्या मैदानात धाव घेतली.
-------------------
९ जुलैलाही एकाच दिवशी चार धक्के
हिंगोली जिल्ह्यात नऊ जुलै रोजी पहाटे १.३७ ते ०३.२३ या दोन तासांत चार सौम्य धक्के जाणवले होते. एकाच दिवशी चार धक्के बसण्याची ती पहिलीच वेळ होती. या चार धक्क्यांची नोंद अनुक्रमे ४.६, ३.६, ३.९, ४.१ रिश्टर स्केल एवढी नोंदली गेली होती. त्यानंतर तीन ऑक्टोबर रोजी पुन्हा दोन धक्के बसले.
-----------
जिल्हा प्रशासनाकडून आढावा
भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेतला असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसह संबंधित सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भूकंपाचे धक्के जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी जावे, इमारती, विद्युत खांब आणि इतर धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे. प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
------------