उत्पादन घटले, बाजारभाव वाढले

उत्पादन घटले, बाजारभाव वाढले
Published on: 
उत्पादन घटले, बाजारभाव वाढले ---- हिंगोलीतील मोंढ्यात सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल सात हजार रुपयांपर्यंत, हमीभाव केंद्रासाठी प्रस्तावही सादर होईना ----- हिंगोली, ता. २६ (बातमीदार) : यंदा अत्यल्प पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, बाजारातील आवकही कमी झाली आहे. परिणामी, बाजार समित्यांच्या मोंढ्यात सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल सात हजार रुपयांपर्यंत पोचला आहे. शासनाने यंदा सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल पाच हजार ७०८ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. खुल्या बाजारात हमीभावापेक्षा जवळपास दीड हजार रुपये अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रांवरील नोंदणीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदा हमीभाव केंद्रे सुरू होण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. अनेक भागांत उत्पादन निम्म्यापेक्षाही कमी झाल्याने बाजारातील आवक घटली आहे. कमी आवक आणि मागणीमुळे दरात वाढ झाली असून, शेतकऱ्यांना खुल्या बाजारात हमीभावापेक्षा अधिक पैसे मिळत आहेत. गतवर्षी सोयाबीनचा हमीभाव प्रतिक्विंटल पाच हजार ३२८ रुपये होता. मात्र, बाजार समित्यांमध्ये चार ते साडेचार हजार रुपयांपर्यंतच दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रांवर विक्रीला पसंती दिली होती. यंदा शासनाने हमीभावात ३८० रुपयांची वाढ करून तो पाच हजार ७०८ रुपये केला असला, तरी खुल्या बाजारातील दराच्या तुलनेत तो कमी पडत आहे. त्यामुळे शेतकरी हमीभाव केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी आणतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ----- केंद्रे सुरू होण्यास विलंब गतवर्षी शेतकऱ्यांकडे सोयाबीन येण्यापूर्वीच हमीभाव केंद्रे सुरू झाली होती. यंदा मात्र सोयाबीन उपलब्ध होऊन १५ ते २० दिवस उलटले, तरी जिल्ह्यात खरेदी केंद्रे सुरू झालेली नाहीत. पणन महासंघाने सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. मात्र, खुल्या बाजारात अधिक दर मिळत असल्याने त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. सध्या केंद्रे सुरू करण्यासाठी केवळ प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ----- संस्थांकडूनही अल्प प्रतिसाद हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी पणन महासंघाने शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बेरोजगार सहकारी संस्थांकडून प्रस्ताव मागविले आहेत. मात्र, खुल्या बाजारातील अधिक दर आणि हमीभाव केंद्रांवरील संभाव्य कमी आवक लक्षात घेता या संस्थाही प्रस्ताव सादर करण्याबाबत फारशा उत्सुक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा हमीभाव केंद्रांवर किती खरेदी होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ----- गतवर्षी ३० केंद्रांवर खरेदी गतवर्षी जिल्ह्यात नाफेड, पणन महासंघ आणि मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून जवळपास ३० हमीभाव केंद्रे सुरू होती. या केंद्रांवर हजारो क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली होती. यंदा मात्र उत्पादनातील घट आणि खुल्या बाजाराच्या तुलनेत कमी असलेला हमीभाव यामुळे खरेदी केंद्रांच्या व्यवहार्यतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. ----- ((कोट)) गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या हमीभावात प्रतिक्विंटल ३८० रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादन घटले असून, खुल्या बाजारात हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हमीभाव केंद्रांकडे वळतील की नाही, हे सांगणे कठीण आहे. नोंदणी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले असून, केंद्रांसाठी प्रस्ताव पाठविण्याबाबत संस्थांनाही कळविले आहे. - पुंडलिक शेवाळे, जिल्हा पणन अधिकारी ----- ((कोट)) मोंढ्यात सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असून, विक्रीनंतर रोख पैसेही मिळतात. हमीभाव केंद्रांवर पैसे मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे खुल्या बाजारात सोयाबीन विकणे परवडते. - नंदू कऱ्हाळे, शेतकरी ----- ((कोट)) अत्यल्प पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. विक्रीतून लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी संकटात आहे. त्यातच खुल्या बाजारातील दरापेक्षा हमीभाव कमी असल्याने केंद्रांवर विक्री करणे फायदेशीर ठरणार नाही. - जगन गांजवे, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com