मेन
----
नोव्हेंबरमध्येच कयाधू कोरडीठाक
----
जलसंकट गडद; विहिरी तळाला, रब्बीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता
----
हिंगोली, ता. १५ (बातमीदार) : जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरविल्याने जलसंकटाची तीव्रता वाढू लागली आहे. भूजलपातळीत जवळपास तीन मीटरने घट झाल्याने विहिरींनी तळ गाठला असून, बोअरवेलही कोरडे पडू लागले आहेत. जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी कयाधू नदी नोव्हेंबर महिन्यातच कोरडीठाक पडल्याने आगामी काळातील पाणीटंचाईचे भीषण चित्र समोर आले आहे. नदीपात्रातील पाण्याचा ठणठणाट आणि उघडे पडलेले बंधारे पाहता यंदा उन्हाळ्यापूर्वीच पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात गेल्यावर्षी १४४.२ टक्के इतका पाऊस झाला होता. यंदा मात्र ऑक्टोबरअखेर सरासरीच्या तुलनेत ६९.९ टक्के पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात यंदा पावसाची मोठी तूट राहिल्याने अनेक भागांत पावसाळा संपतानाच विहिरींनी तळ गाठला, बोअरवेल कोरडे पडले. भूजलपातळीत सुमारे तीन मीटरने घट झाली आहे. दरवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये कयाधू नदीपात्रातील बंधारे तुडुंब भरलेले असतात. यंदा मात्र संपूर्ण पात्र कोरडेठाक पडले आहे.
कयाधू नदीचा उगम रिसोड तालुक्यातून होता. त्यानंतर ही नदी जिल्ह्यातील सेनगाव, हिंगोली, कळमनुरी या तीन तालुक्यांतून सुमारे ९९ किलोमीटरचा प्रवास करते. या नदीच्या पाणलोट क्षेत्रात जवळपास १५४ गावांचा समावेश आहे. त्यामुळे या नदीवर परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची मोठी भिस्त आहे. दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत नदीवरील बंधारे पाण्याने तुडुंब भरलेले असतात. यंदा मात्र नोव्हेंबरच्या सुरवातीलाच नदीपात्र कोरडे पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणी आणि सिंचनावर होण्याची शक्यता आहे.
----------
बंधारे असूनही पाण्याचा ठणठणाट
कयाधू नदीवर ठिकठिकाणी छोटे बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने नदीपात्रात पुरेसा जलसाठा निर्माण झाला नाही. परिणामी, बंधारे असूनही पाणी टिकून राहिले नाही. आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने जलसाठ्यांचे नियोजन आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
----------
दहा उच्च पातळी बंधाऱ्यांची प्रतीक्षा
कयाधू नदीवर दहा उच्च पातळी बंधारे प्रस्तावित असून, या बंधाऱ्याचे सर्वेक्षणही झाले आहे. यामध्ये बेलवाडी, खरबी, गडगीळवाडी, नर्सी नामदेव, ब्रह्मपुरी, कारेगाव, वरूड चक्रपान, कवठा पूल, कोंडवाडा, कहाकर येथे बंधारे उभारण्यात येणार आहेत. मात्र, या बंधाऱ्याची निविदा प्रक्रिया थंड बस्त्यात आहे.
-----------
((कोट))
कयाधू नदी ही जिल्हावासीयांसाठी जीवनवाहिनी आहे. या नदीला पूर्वी बाराही महिने पाणी वाहत असे. अलीकडच्या काळात मात्र पावसाचे कमी झालेले प्रमाण आणि उपसा यामुळे नदी हिवाळ्यातच कोरडी होत आहे. याकरिता नदीवर उच्च पातळीचे बंधारे बांधणे, नदीपात्रांचे खोलीकरण होणे आवश्यक आहे.
- रामेश्वर मांडगे, शेतकरी
----------
((कोट))
कयाधू नदीवर दहा उच्च पातळी बंधारे उभारणे आवश्यक आहे. बंधारे उभारले तरच नदीच्या पाण्याचा शेतकऱ्यांचा उपयोग होणार आहे. या बंधाऱ्यांसाठी मी अनेकवेळा आंदोलनेही केली असून, आता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयाने निविदा काढण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे. उच्च पातळीचे बंधारे झाल्यानंतर नदीपात्र कोरडे होणार नसून, शेतकऱ्यांना याचा उपयोग होईल.
- डाॅ. रमेश शिंदे, शेतकरी नेते
--------
((कोट))
हिंगोली शहराला पुराचा धोका कमी व्हावा, यासाठी गेल्या उन्हाळ्यात शहर परिसरात कयाधू नदीपात्राचे रुंदीकरण करण्यात आले होते. मात्र, यंदा पाऊसच अत्यल्प झाल्याने एकदाच नदी दुथडी भरून वाहिली. त्यानंतर मात्र पाऊसच झाला नसल्याने पावसाळा संपताना पात्र कोरडे पडले. या नदीचे खोलीकरण होणे गरजेचे आहे.
- बबन बोचरे, शेतकरी