पावसाचा प्रदीर्घ खंड; ‘पिवळे सोने’ करपले

पावसाचा प्रदीर्घ खंड; ‘पिवळे सोने’ करपले
Published on: 
हिंगोली ः जिल्ह्यात दोन महिन्यांपासून पावसाने खंड दिल्याने हळद पिकाची वाढ खुंटली असून उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. --------------- जिल्ह्यात ‘पिवळे सोने’ करपले! ---- पाण्याअभावी ३७ हजार हेक्टरवरील हळद पाण्याअभावी धोक्यात ---- सकाळ वृत्तसेवा हिंगोली, ता. १५ ः हळद उत्पादक जिल्हा म्हणून देशभरात ओळख असलेल्या हिंगोली जिल्ह्यात यंदा पावसाच्या खंडामुळे ‘पिवळे सोने’ संकटात सापडले आहे. तब्बल दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावली असून, हळदीला पाणी देणेही अवघड झाले आहे. परिणामी, जिल्ह्यातील ३७ हजार हेक्टरवरील हळद पाण्याअभावी करपून जात आहे. देशभरातील एकूण हळद उत्पादनापैकी जवळपास १५ टक्के उत्पादन देणारा ‘हळदीचा जिल्हा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगोलीत यंदा पावसाने दांडी मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. तब्बल दोन महिन्यांपासून पावसाचा पत्ता नसल्यामुळे तलावाच्या पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. विहिरी, बोअरवेलची पाणीपातळी खालावली आहे. पाण्याअभावी शेतातील उभी हळद करपून जात असून, आगामी हंगामात उत्पादन निम्म्यावर येण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत पाऊस झाला नाही, तर हिंगोलीचे ‘पिवळे सोने’ पूर्णपणे हातातून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. -- एकरी लाखाचा खर्च वाया जाण्याची भीती जिल्ह्यात यंदा तब्बल ३७ हजार ८७१ हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यापासून हळदीच्या पांढऱ्या मुळ्या वाढून गड्ड्या (शेंग) धरण्याची प्रक्रिया सुरू होते. याच मुख्य काळात पावसाने ताण दिल्यामुळे पीक धोक्यात आले आहे. एका एकरावर शेतकऱ्यांचा आत्तापर्यंत किमान १ लाख रुपये लागवड खर्च झाला आहे. लेकराप्रमाणे जोपासलेली पिकाची पाने दुपारच्या उन्हात सुकत असल्याचे पाहून शेतकरी हवालदील झाले आहेत. ------- वीज समस्या बनली गंभीर एकीकडे पाण्याचा अपुरा साठा आणि दुसरीकडे दिवसेंदिवस वीज समस्या गंभीर बनत चालली आहे. भारनियमनाव्यतिरिक्त वीजपुरवठा सुरळीत राहत नसल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. सध्या विहिर, बोअरमध्ये जो काही पाणीसाठा आहे, त्यावर पिके वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र, वीजपुरवठा सुरळीत राहत नसल्याने शेतकऱ्यांपुढे समस्या अधिक गंभीर बनली आहे. ---- उत्पादनात येणार घट; भाव वधारले पावसाच्या खंडामुळे येणाऱ्या हंगामात हळदीचे उत्पादन निम्म्याखाली येण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या हळदीला समाधानकारक भाव मिळत आहे. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात १५ ऑक्टोबर रोजी सुमारे दीड हजार क्विंटलची आवक झाली होती. दर्जेदार हळदीने २२ हजार रुपयांचा पल्ला गाठला. तर, दोन दिवसांपूर्वी वसमतच्या मोंढ्यात दर्जेदार हळदीला २५ हजाराचा भाव मिळाला होता. सध्या भाव वधारले असले तरी शेतकऱ्यांनी यापूर्वी हळद विक्री केली. त्यामुळे भाववाढीचा लाभ शेतकऱ्यांऐवजी साठेबहाद्दरांनाच अधिक होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com