निराधार रुग्णाला उपचारांसह मिळाला सुरक्षित निवारा
नांदेड : कोण आहे, कुठला आहे, त्याची घरी कोण वाट पाहत आहे, याची माहिती नसतानाही एका निराधार रुग्णाच्या उपचारांची जबाबदारी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने घेतली. उपचार पूर्ण झाल्यानंतर रुग्णाला रुग्णालयाबाहेर सोडून न देता सुरक्षित निवारा मिळवून देत औषधवैद्यकशास्त्र विभागाने माणुसकीचा परिचय दिला. ६० वर्षीय या रुग्णाचे मदर तेरेसा होम शांतिनिकेतन, मालटेकडी येथे पुनर्वसन करण्यात आले. ८ ऑगस्ट रोजी हा रुग्ण हिंगोली येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातून १०८ रुग्णवाहिकेने विष्णुपुरी येथील रुग्णालयात दाखल झाला होता. उपचारादरम्यान तो औंढा तालुक्यातील बेरुळा येथील रहिवासी असल्याचे समोर आले. २० ऑगस्ट रोजी औंढा नागनाथ पोलिसांशी पत्रव्यवहार करून नातेवाइकांचा शोध घेण्यात आला. मात्र, जबाबदार नातेवाईक उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे व विभागप्रमुख डॉ. शीतल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) संतोष मुंगल यांनी पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण केली. २९ सप्टेंबर रोजी वाहनचालक आवराळे व कक्ष सेवक मारुती राठोड यांच्या सोबत रुग्णाला मदर तेरेसा शांतिनिकेतन येथे सुरक्षित दाखल करण्यात आले.