पुनर्विकास, नूतनीकरणातून जुन्या घरांची नवी बाजारपेठ!
----
मध्यवर्ती शहरातील वसाहती, सोसायट्या आणि स्वतंत्र घरांना मूल्यवर्धनाची मोठी संधी
------
हरेंद्र केंदाळे ः सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर ः शहराचा विस्तार होत असताना केवळ नव्या गृहप्रकल्पांना बाजारपेठ मिळत नाही, तर शहरातील जुन्या घरांकडेही नव्या दृष्टीने पाहिले जात आहे. जुन्या शहरातील घरे, सोसायट्या आणि स्वतंत्र बंगले यांचे रिनोव्हेशन (नूतनीकरण) करून त्यांना आधुनिक स्वरूप देण्याचा कल वाढत आहे. काही ठिकाणी मात्र केवळ दुरुस्ती पुरेशी नसल्याने रिडेव्हलपमेंटचा (पुनर्विकास) पर्याय पुढे येत आहे. त्यामुळे ‘जुनी मालमत्ता म्हणजे कमी मूल्य’ ही पारंपरिक धारणा बदलत असून, जुन्या घरांचे रूपांतर हीदेखील प्रॉपर्टी क्षेत्रातील स्वतंत्र बाजारपेठ बनू लागली आहे.
शहरातील अनेक भागांमध्ये ३० ते ४० वर्षांपूर्वी बांधलेली घरे आजही वापरात आहेत. काळानुसार घरांची अंतर्गत रचना, स्वयंपाकघर, स्नानगृह, वीज व्यवस्था, प्लंबिंग, फरशी, खिडक्या-दारे आणि इतर सुविधांमध्ये बदलाची गरज निर्माण होते. अशावेळी घर विकून दुसरीकडे जाण्याऐवजी त्याच मालमत्तेत सुधारणा करण्याचा पर्याय अनेक कुटुंबांकडून विचारात घेतला जात आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांबरोबरच आर्किटेक्ट, इंटेरियर डिझायनर, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, इलेक्ट्रिकल-प्लंबिंग सेवा, मॉड्युलर किचन, फर्निचर आणि घरातील तांत्रिक सुविधांशी संबंधित व्यवसायांसाठीही नवी बाजारपेठ निर्माण होत आहे.
------
चौकट
मानसिकता बदलतेय
पूर्वी जुन्या घराचा विचार प्रामुख्याने विक्रीच्या दृष्टीने केला जात असे. घर जुने झाले, की त्याची किंमत कमी होते, अशी सर्वसाधारण धारणा होती. आता मात्र मालमत्तेचे मूल्य ठरविताना घराचे वय हा एकमेव निकष राहिलेला नाही. मालमत्तेची रचना, बांधकामाची स्थिती, प्लॉटचा आकार, उपलब्ध जागा, घरातील बदल करण्याची शक्यता आणि भविष्यातील वापर यांचा विचार केला जात आहे.
----
चौकट
चांगल्या प्लॉटवर असलेले जुने घर योग्य रिनोव्हेशननंतर पुन्हा आकर्षक होऊ शकते. स्वतंत्र घरांच्या बाबतीत ही शक्यता अधिक आहे. घराचा काही भाग वापरात नसल्यास त्याचे नव्याने नियोजन करता येते. अतिरिक्त खोली, पार्किंग, स्टोअरेज, आधुनिक स्वयंपाकघर किंवा घरातील इतर सुविधा वाढविण्याची संधी असल्यास मालमत्तेचा वापर अधिक परिणामकारक करता येतो.
----
चौकट
रंगरंगोटीपुरते रिनोव्हेशन नाही
घराचे रिनोव्हेशन म्हटले, की पूर्वी रंगकाम, फरशी बदलणे किंवा काही किरकोळ दुरुस्ती एवढाच त्याचा अर्थ घेतला जात होता. आता मात्र रिनोव्हेशनचा आवाका मोठा झाला आहे. घर मोठे करण्यापेक्षा उपलब्ध जागेचा चांगला वापर या विचाराला मिळणारे महत्त्व. पूर्वी कमी वापरली जाणारी जागा नव्या आराखड्यात उपयोगात आणल्यास घराच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होऊ शकते.
---
चौकट
यावर अधिक लक्ष
जुन्या घरामध्ये आवश्यकतेनुसार अंतर्गत आराखडा बदलणे, स्वयंपाकघराचे आधुनिकीकरण, स्नानगृहाचे नूतनीकरण, नवीन विद्युत व्यवस्था, प्लंबिंगची दुरुस्ती, ऊर्जा बचतीची साधने, नैसर्गिक प्रकाश व हवा वाढविणे, स्टोअरेजची योग्य रचना, फर्निचरचे पुनर्नियोजन अशा अनेक बाबींचा समावेश केला जातो.
----
चौकट
घराची संरचना तपासणीही महत्त्वाची
रिनोव्हेशन करताना केवळ बाह्य सौंदर्याकडे लक्ष देणे पुरेसे नाही. जुन्या घराची संरचनात्मक स्थिती तपासणे आवश्यक ठरते. भिंती, स्लॅब, बीम, कॉलम, छत, पाण्याची गळती, जुन्या पाइपलाइन आणि विद्युत वायरिंगची अवस्था याचा तज्ज्ञांकडून आढावा घेणे गरजेचे आहे. जुन्या इमारतींमध्ये अतिरिक्त बांधकाम किंवा अंतर्गत बदल करण्यापूर्वी संरचनात्मक क्षमता तपासली नाही, तर पुढे समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रिनोव्हेशनच्या बाजारपेठेत केवळ इंटिरियर नव्हे, तर तांत्रिक सल्ला आणि स्ट्रक्चरल ऑडिटलाही महत्त्व येत आहे.
-----
चौकट
रिनोव्हेशनपूर्वी काय तपासाल?
बांधकामाची सद्यस्थिती काय आहे?
स्लॅब, बीम आणि कॉलमची अवस्था
प्लंबिंग व विद्युत व्यवस्था आहे का?
पाण्याची गळती किंवा ओलावा
घराच्या आराखड्यात बदलाची शक्यता
आवश्यक परवानग्या घेतल्यात का?
अंदाजपत्रक आणि कामाचा कालावधी
भविष्यातील देखभालीचा खर्च
----------------------
चौकट
पुनर्विकास की नूतनीकरण?
प्रत्येक जुन्या घरासाठी रिनोव्हेशन हा योग्य पर्याय असेलच असे नाही. काही इमारतींचे बांधकाम इतके जुने झालेले असते, की वारंवार दुरुस्ती करण्यापेक्षा पुनर्विकास अधिक व्यवहार्य ठरू शकतो. जुन्या सोसायट्यांच्या बाबतीत हा मुद्दा महत्त्वाचा आहे. इमारतीची संरचनात्मक स्थिती, उपलब्ध भूखंड, रहिवाशांची संख्या, पार्किंगची गरज, सामायिक सुविधा आणि भविष्यातील वापर यांचा विचार करून पुनर्विकासाचा निर्णय घ्यावा लागतो. पुनर्विकास म्हणजे केवळ जुनी इमारत पाडून नवी इमारत उभारणे नव्हे. त्यामध्ये विद्यमान रहिवाशांचे हक्क, विकसकाची क्षमता, करारातील अटी, बांधकामाचा कालावधी, संक्रमण काळातील व्यवस्था आणि नवीन इमारतीतील सुविधांचा विचार करावा लागतो. त्यामुळे पुनर्विकासाच्या प्रक्रियेत घाईपेक्षा कायदेशीर आणि तांत्रिक स्पष्टता अधिक महत्त्वाची ठरते.