औरंगाबाद : बाजारपेठेत एकाच दिवसात ८० ते १०० कोटींची उलाढाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन चारचाकी वाहन खरेदी केल्यावर वाहनाची पूजा करताना महिला.

औरंगाबाद : बाजारपेठेत एकाच दिवसात ८० ते १०० कोटींची उलाढाल

औरंगाबाद - कोरोनात दोन वर्षे गेल्यानंतर यावर्षी अक्षय तृतीयेला बाजारातील चैतन्य पुन्हा परतले. अक्षय तृतीयानिमित्त मंगळवारी (ता.३) सराफा, वाहन बाजार, रिअल इस्टेटसह एकूणच बाजारपेठेत ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. एकाच दिवसात जवळपास सुमारे ८० ते १०० कोटींच्यावर उलाढाल झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. भारतात सोन्याशी धार्मिक आणि सांस्कृतिक भावना निगडित आहेत. गेल्या दोन वर्षांत लॉकडाउनमुळे सराफा व्यवसाय फारसा चांगला नव्हता; पण यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे आणि आर्थिक घडामोडींनाही वेग आला आहे. या मुहूर्तावर शहरात साधारणपणे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत दुप्पट सोन्याची विक्री झाल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले.

दिवाळी, दसऱ्याप्रमाणे या मुहूर्तावर घर, वाहन, सोने यासह अन्य नवीन वस्तूंच्या खरेदीला नागरिक प्राधान्य देतात. ही बाब लक्षात घेता हा सण कॅश करण्यासाठी व्यापारीवर्गाने जोरदार तयारी केली होती. सराफा बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची मोठी वर्दळ दिसून आली. अनेक ग्राहकांनी आधीच दागिने बुक करत मुहूर्तावर तो घरी नेल्याचे सराफा व्यापारी उदय सोनी यांनी सांगितले. त्यात अनेकांनी लग्नसराईची खरेदीही केली. या मुहूर्तावर खास करून शुद्ध सोन्याचे नाणे, वेढणे यासह लाईटवेट दागिने यांची खरेदी करण्यास ग्राहक प्राधान्य देतात, असे त्यांनी नमूद केले. ग्राहकांचा असाच उत्साह कायम राहील, अशी अपेक्षा जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय जैस्वाल यांनी व्यक्त केली. दरम्यान सराफा, वाहन बाजार, रिअल इस्टेटसह कापड, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, पंखा, एअरकुलर, एअरकंडिशनर, वॉशिंग मशीन, फ्रीज, टीव्ही, एलसीडी, एलईडी, होम अप्लायन्सेस, फर्निचर आदी साहित्याच्या खरेदीसाठीही ग्राहकांची लगबग दिसून आली.

पाचशे घरांची उलाढाल

रिअल इस्टेट क्षेत्रातही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले. या मुहूर्तावर अनेकांनी आपले हक्काचे घर असावे म्हणून घर, फ्लॅट, प्लॉट बुकिंगला प्राधान्य दिले असून काहींनी या मुहूर्तावर गृहप्रवेश केला. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ३०० नवीन घरांमध्ये नागरिकांनी गृहप्रवेश केला तर दोनशेहून अधिक घरांची बुकिंग करण्यात आली. अशा जवळपास पाचशे घरांची उलाढाल झाल्याचे क्रेडाईचे अध्यक्ष नितीन बगडिया यांनी सांगितले.

प्रत्यक्ष सोने पाहून खरेदीकडे कल

अक्षय तृतीयेला रमजान ईदची सार्वजनिक सुटी आली, त्यामुळे सोनेखरेदीला चालना मिळाली असून सकाळपासून ग्राहकांची गर्दी होती. दरम्यान लॉकडाउन काळात अनेक नवे ग्राहक ऑनलाइन खरेदीच्या माध्यमातून जोडले गेले आहेत, यात या ग्राहकांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. परंतु, सार्वजनिक सुटी आल्यामुळे प्रत्यक्ष सोने पाहून खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला दिसला.

चारचाकीसाठी अनेकजण वेटिंगवर

अक्षय तृतीयेला वाहन बाजारातही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या मुहूर्तासाठी चारशे चारचाकी वाहनांची बुकिंग झालेली आहे. तर १८०० दुचाकी वाहनांची नागरिकांनी खरेदी केली. यातून सुमारे चाळीस कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याचे चारचाकी शोरूमचे व्यवस्थापक विकास वाळवेकर यांनी सांगितले. तसेच दुचाकीसह चारचाकी खरेदी जोमात झाली; परंतु आवडत्या चारचाकीसाठी अनेकांना वेटिंग करावी लागल्याचेही त्यांनी सांगितले.