शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप केंव्हा?

शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप केंव्हा?
Published on
गुरुजींच्या पाठीवर कौतुकाची थाप कधी? --- जळकोट तालुक्यातील शिक्षकांना पुरस्काराची प्रतीक्षाच विवेक पोतदार जळकोट,ता.१ : शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात गाव, वाडी, तांड्यावर ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना दिला जाणारा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार गेल्या काही वर्षापासून रखडला आहे. त्यामुळे गुरुजींच्या पाठीवर कौतुकाची थाप केव्हा पडणार असा सवाल विचारला जात आहे. तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मागील काही वर्षांपासून, वितरित करण्यात आलेला नाही. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी गुणवंत व उपक्रमशील शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. मात्र मागील काही वर्षापासून हे पुरस्कार दिले नसल्याने यावर्षी तरी तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण केले जाईल काय याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे. विद्यार्थीप्रिय, राष्ट्रीय कार्यात सहभाग, नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे, शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्नशील, क्रीडा व शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विद्यार्थांना प्रावीण्य मिळवून देणाऱ्या अशा विविध उपक्रमात सक्रिय असणाऱ्या, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली जाते. माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी हे बंद पडलेले आदर्श शिक्षक पुरस्कार पुन्हा सुरू करण्यासाठी लक्ष घालावे. तसेच जळकोट पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी ऐश्वर्या चितारी व नूतन गटशिक्षणाधिकारी रश्मिता साहू यांनी पुढाकार घेऊन बंद पडलेला आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा या वर्षापासून तरी पुन्हा सुरू करावा, अशी मागणी केली जात आहे. ----- जळकोट पंचायत समिती कार्यालयात पंचायत समिती सदस्य, व जिल्हा परिषद सदस्य यांच्या उपस्थितीत मासिक बैठकीत मी आदर्श शिक्षक पुरस्कार गेल्या नऊ वर्षापासून बंद आहे, तो परत सुरू करण्याबाबत मुद्दा मांडला होता. संबंधित अधिकाऱ्यांनी यावर्षीपासून तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात येईल असे बैठकीत सांगितले आहे. -राहुल झोले, सदस्य, पंचायत समिती ------ जळकोट तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मागील काही वर्षांपासून वितरित करण्यात आलेले नाहीत. गुणवंत, उपक्रमशील व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने यावर्षी या तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे समारंभात वितरण करण्यात येणार आहे. यामुळे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान होईल. यासंदर्भात तालुक्यातून अशा शिक्षकांची आपण माहिती मागवलेली आहे. छाननी करणे बाकी आहे.लवकरच याचे नियोजन करण्यात येईल. -रश्मिता साहू, गटशिक्षणाधिकारी, जळकोट --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com