तलमोड टोलनाक्याजवळ
उमरगा पोलिसांची कारवाई
उमरगा, ता. १४ (बातमीदार) : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलमोड टोलनाक्याजवळ अवैधपणे गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारे वाहन उमरगा पोलिस ठाण्याच्या पथकाने पकडली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५९ हजार रुपये किमतीची आठ गोवंशीय जनावरे आणि पाच लाख रुपयांचे वाहन असा एकूण ५ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, चालकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
सोलापूर-हैदराबाद महामार्गावरून सोमवारी (ता. १२) पहाटे पिकअप (एमएच-४३ बीएक्स-१२८५) जात होती. या वाहनामध्ये आठ देशी व जर्सी खोंड आणि कारवड या गोवंशीय जनावरांना चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता दाटीवाटीने बांधून नेले जात होते. उमरगा पोलिसांच्या पथकाला याबाबतची माहिती मिळताच त्यांनी तलमोड टोलनाक्याजवळ सापळा रचून सदर वाहनाला ताब्यात घेतले.
.....................
UMR26A18829
उमरगा : सेवा संकल्प अभियानाअंतर्गत उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, तहसीलदार गोविंद येरमे, डॉ. उमाकांत बिराजदार यांच्या उपस्थितीत नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
उमरग्यात तालुकास्तरीय शिबिर
उमरगा, ता. १४ (बातमीदार) : सर्वसामान्य नागरिकांची प्रलंबित प्रशासकीय कामे जलद गतीने मार्गी लावण्यासाठी आणि विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत मंगळवारी (ता. १३) तहसील कार्यालयात तालुकास्तरीय शिबिर घेण्यात आले.
उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे अध्यक्षस्थानी होते. तहसीलदार गोविंद येरमे यांनी प्रास्ताविक केले. शिबिरास महसूल, कृषी, पंचायत समिती, सार्वजनिक आरोग्य, भूमी अभिलेख आणि महावितरण अशा सर्व प्रमुख शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिबिरादरम्यान विविध योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच नागरिकांचे प्रलंबित अर्ज, विविध प्रकारचे शासकीय दाखले, जमिनीचे फेरफार नोंदी, शिधापत्रिका दुरुस्ती आणि कृषी योजनांशी संबंधित अनेक प्रकरणांचा जागीच निपटारा करण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान शासकीय योजनांच्या लाभासोबतच या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रशासनातर्फे विशेष रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
.............
TUL26A11619
तुळजापूर ः आमदार नीलम गोरे यांनी मंगळवारी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मीना सोमाजी, जिल्हा सरचिटणीस संगीता काळे, सांगली संपर्कप्रमुख सुनीता मोरे, सुषमा इंगळे व इतर.
तुळजाभवानी चरणी
आमदार गोरेंचे साकडे
तुळजापूर, ता. १४ (बातमीदार) : आर्थिक अडचणींमुळे कुणालाही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागू नये. दुष्काळीस्थिती निवारणासाठी शक्ती देण्याचे साकडे तुळजाभवानी मातेकडे घातल्याचे विधान परिषदेच्या आमदार नीलम गोरे यांनी मंगळवारी (ता. १३) सांगितले. तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.
आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या नागरिकांना कर्जवसुलीच्या तक्रारींमुळे आणखी त्रास सहन करावा लागू नये, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे मत आमदार गोरे यांनी व्यक्त केले. सध्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी विविध अडचणींना सामोरे जात आहेत. शेतकरी आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी संवेदनशीलतेने काम करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. संकटाच्या काळात नागरिकांनी खचून न जाता मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजित पिंगळे, तालुकाप्रमुख अमोल जाधव, जिल्हाप्रमुख मीना सोमाजी, जिल्हा सरचिटणीस संगीता काळे, सांगली संपर्कप्रमुख सुनीता मोरे, सुषमा इंगळे आदी उपस्थित होते.
..................
KLL26B10873
कळंब ः एड्स जनजागृती प्रशिक्षणादरम्यान मार्गदर्शन करताना डॉक्टर व प्राध्यापक.
‘एड्सबाधितांना सन्मानाने जगण्याची संधी द्या’
कळंब, ता. १४ (बातमीदार) : एड्सबाधित व्यक्तींना समाजापासून वेगळे न ठेवता त्यांना सन्मानाने जगण्याची संधी द्यावी, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम पाटील यांनी केले.
उपजिल्हा रुग्णालय कळंब, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना आणि रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. १२) एड्स जनजागृती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना रुग्णालयातील विविध विभागांची माहिती देण्यात आली. डॉ. पाटील यांनी एड्सविषयी माहिती दिली. संक्रमित मातेकडून बाळालाही संसर्ग होण्याची शक्यता असते. या आजाराविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करून बाधित व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. मीरा दशरथ यांनीही एड्सबाधित व्यक्तींशी भेदभाव न करता त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळायला हवा, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला डॉ. शरद दशरथ, डॉ. आयशा खान, प्रगती भंडारे, परशुराम कोळी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. राघवेंद्र ताटीपामुल, प्रा. डॉ. हेमंत चांदोरे, प्रा. एन. एम. अंकुशराव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रबंधक हनुमंत जाधव आणि कार्यालयीन अधीक्षक अरविंद शिंदे यांनी सहकार्य केले.
......................
स्वआधार बालगृहात
आरोग्य तपासणी शिबिर
धाराशिव, ता. १४ (बातमीदार) : प्रत्येक बालकाला शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेच्या बाबतीत समान संधी मिळणे हा त्याचा मूलभूत हक्क आहे. विशेषतः बौद्धिक दिव्यांगत्व असलेल्या आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करणाऱ्या व्यक्तींना सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांच्या अधिकारांविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे, असे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी व्यक्त केले.
जागतिक मानसिक आरोग्य दिन आणि आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त तालुक्यातील आळणी येथील स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह व शाळेत सोमवारी (ता. १२) आरोग्य तपासणी शिबिर आणि कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि बालगृहाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते झाले. त्यांनी बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य आरोग्यसेवा, सुरक्षित वातावरण आणि आवश्यक संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला. तसेच राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.
उपमुख्य न्यायरक्षक ॲड. अभय पाथरूडकर यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने बालगृहातील मुलींची आरोग्य तपासणी केली. यावेळी विविध वैद्यकीय तज्ज्ञ सहभागी झाले होते. बालगृहाचे सचिव शहाजी चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. अन्नपूर्णा लठ्ठे यांनी सूत्रसंचालन केले, तर निकिता माने यांनी आभार मानले.