मानसपुरी शिवारात जुगारावर
छापा; पंधरा जणांवर गुन्हा
----
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. ९ : कंधार ते उस्माननगर मार्गावरील मौजे मानसपुरी शिवारात सुरू असलेल्या अवैध तिर्रट जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत १५ जणांविरुद्ध कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार लाख तीन हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील चार आरोपी फरार झाले आहेत.
७ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना मानसपुरी शिवारातील मोकळ्या जागेत काही जण तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने घटनास्थळी छापा टाकला. यावेळी १५ जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन दुचाकी, सात मोबाईल, रोख ५४ हजार ५२० रुपये आणि जुगाराचे साहित्य असा एकूण चार लाख तीन हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शेख नूर मोहम्मद, शेख रब्बानी, मरीबा वाघमारे, उत्तम गिरडे, महेंद्र कोल्हे, बालाजी गोवंदे, शिवाजी ससाणे, अरुण लोहकरे, देवीदास घोगरे, अनिश घोगरे आणि विजय कोकरे यांच्यासह एकूण १५ जणांविरुद्ध कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, दीपक खैरे, संग्राम मोरे, दादाराव जाधव आणि राजू इंगेवाड हे चार आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रवी वाहुळे, पोलिस उपनिरीक्षक महेश कोरे तसेच पथकातील श्रीराम दासरे, मनोज राठोड आणि सुधाकर देवकते यांनी केली.