दुष्काळात अवैध सावकारीचा फास
----
‘एक्स्प्रेस लोन’च्या नावाखाली २५ ते ३० टक्के व्याजाने लूट
-----
अमोल राजूपत
वैजापूर, ता. ३ : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून विविध उपाययोजना सुरू असल्या, तरी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात फोफावलेल्या अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याचे चित्र आहे. आधीच दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा सावकारी फास अधिक चिंताजनक ठरत आहे.
तालुक्यात सध्या काही राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांसह सहा नोंदणीकृत सावकारी परवाने आणि ३४ पतसंस्था आहेत. या अधिकृत संस्था व सावकारांच्या माध्यमातून शेतकरी व लहान-मोठ्या व्यावसायिकांना कर्जपुरवठा केला जातो. मात्र, ग्रामीण भागातील अनेकांचे ‘सिबिल’ कर्जयोग्य नसल्याने त्यांना बँकांकडून कर्ज मिळत नाही. याचाच गैरफायदा अवैध सावकार घेत आहेत.
----
शंभर दिवसांत कर्जाची वसुली
बँकांकडून कर्ज न मिळणारे गरजू नागरिक ‘एक्स्प्रेस लोन’च्या नावाखाली अनधिकृत सावकारांकडून अव्वाच्या सव्वा दराने कर्ज घेतात. या प्रकारात कोरे धनादेश, कोरे मुद्रांक आदी कागदपत्रे लिहून घेतली जातात. त्यावर तब्बल २५ ते ३० टक्क्यांपर्यंत व्याज आकारले जाते आणि अवघ्या शंभर दिवसांत कर्जाची वसुली केली जाते. वेळेत हप्ता किंवा रक्कम भरता न आल्यास कर्जदाराला दमदाटी करणे, तसेच वाहने ओढून नेण्यासारखे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी आहेत. वाढता कर्जाचा डोंगर आणि सावकारांचा तगादा यामुळे काहींना घर सोडावे लागले आहे, तर काहींनी टोकाचे पाऊल उचलले आहे.
----
दहा वर्षांत १२६ आत्महत्या
२०१५ ते २०२५ या दहा वर्षांच्या कालावधीत तालुक्यातील तब्बल १२६ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची शासकीय दप्तरी नोंद आहे. या शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाकडून नियमानुसार आर्थिक मदत करण्यात आली; मात्र केवळ आर्थिक मदतीने कुटुंबावर आलेले संकट आणि निर्माण झालेली पोकळी भरून निघत नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना सुलभ कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्याबरोबरच अवैध सावकारीवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
----
नियम धाब्यावर बसवून कर्ज वाटप
महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या कलम ३१ (१) नुसार, नोंदणीकृत खासगी सावकारांना तारण कर्जावर अधिकतम ९ टक्के, तर विनातारण कर्जावर १२ टक्के व्याजदर आकारता येतो. पतसंस्थांना कर्ज प्रकारानुसार १० ते १५ टक्के व्याज आकारता येते. परंतु, तालुक्यातील अनेक ठिकाणी नोंदणीकृत सावकार व काही पतसंस्था हे नियम धाब्यावर बसवून कर्जवाटप करत असल्याचा ग्रामीण भागात सूर आहे. याशिवाय, अवैध सावकार २० ते ३० टक्क्यांपर्यंत बेकायदेशीर व्याज लावून पिळवणूक करत असल्याचे चित्र आहे.
--
((कोट))
अवैधरीत्या कर्जाबाबत शेतकरी अथवा इतर कुणाचीही फसवणूक किंवा पिळवणूक होत असेल, तर तक्रारदाराने आमच्याकडे पुराव्यांसह अर्ज करावा. संबंधितांवर तत्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- नीलेश देशमुख, सहायक निबंधक, वैजापूर