Illegal Money Lending : कुणी धरले पाय, कुणी धाय मोकलून रडले!

‘लहानाचा मोठा होईपर्यंत ‘तिच्या’ घरी पडेल ते काम केले. लग्न झाल्यानंतर काम थांबवले, परंतु....
money laundering
money launderingsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - ‘लहानाचा मोठा होईपर्यंत ‘तिच्या’ घरी पडेल ते काम केले. लग्न झाल्यानंतर काम थांबवले, परंतु पैशांची गरज पडल्याने तिच्याकडून व्याजाने ६० हजार रुपये घेतले. त्या बदल्यात तिने माझी दोन एकर जमीन गहाणखत करून घेते म्हणत थेट रजिस्ट्रीच करून घेतली.

आता मी काय करू मॅडम...?’ अशी आर्त साद घालत कर्ज घेतलेला तरुण तालुका उपनिबंधकांसमोर अक्षरशः ओक्सीबोक्सी रडला. रवी जाधव (रा. नक्षत्रवाडी) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार गुरुवारी (ता. तीन) सायंकाळी पाचदरम्यान तालुका उपनिबंधक कार्यालयात सुनावणीदरम्यान घडला.

तालुका उपनिबंधक सहकारी संस्था सुरेखा फुपाटे यांनी पथकासह कांचनवाडी परिसरात अवैध सावकारी प्रकरणी एका महिलेच्या घरी छापा टाकला होता. त्यावेळी काही दस्तऐवज, पुरावे अधिकाऱ्यांनी जप्त केले होते. या प्रकरणात दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी फुपाटे यांनी संबंधित महिलेसह कर्जदारांना बोलाविले होते. सुनावणी सुरू असताना रवीला आपली बाजू मांडताना रडू कोसळले.

आता तरी आमचा पिच्छा सोडा

सुनावणी संपताच सावकर महिला बाहेर आली. याचदरम्यान ‘आता तरी आमचा पिच्छा सोडा, तेवढी जमीन परत द्या’ असे म्हणत आबाराव चव्हाण यांनी अक्षरशः महिलेचे पाय धरले. त्यादरम्यान महिलेने आकांडतांडव करत हमरीतुमरी करण्यास सुरवात केली. त्याचवेळी सुनावणीसाठी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आतातरी आमच्या जमिनी द्या, अशी मागणी केली.

त्यावर महिलेचा पारा चढला आणि शेतकरीही संतप्त झाले, त्याचवेळी महिलेने एकटीला बघून अंगावर येता काय? असे म्हणत हमरीतुमरी केली. अखेर सहकार अधिकारी वैशाली येसगे यांच्यासह सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत वाद मिटविला.

सापडली सावकारी व्याजाची चिठ्ठी

सावकार महिलेच्या घरात छापा मारला, त्या दिवसापासून संबंधित महिला सहकार विभागाला माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी महिलेच्या घरातून आणि कपड्याच्या दुकानातून आजवर २००५ पासूनचे जमिनी, तसेच प्लॉटची तब्बल १२५ खरेदीखते, इसार पावत्या, मुख्य्त्यारनामा, प्लॉट विक्री करारनामा, तसेच शेतकऱ्यांची जमीन बळकावून स्वतःच्या नावावर केल्यानंतर तलाठ्याने दिलेला सातबारा, कर्जाच्या नोंदवह्या जप्त केल्या आहेत.

याशिवाय ९ कोरे बॉण्ड, राष्ट्रीयीकृत बॅंकांसह इतर बॅंकाचे तब्बल ६१ कोरे धनादेश सापडले. महत्त्वाचे म्हणजे, गुरुवारी सुनावणीदरम्यान एका कर्जदाराने अधिकाऱ्यांना गुलाबी रंगाची व्याजाचा व्यवहार झाल्याची चिठ्ठी जमा केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

६० ते ७० हजार रुपयांच्या बदल्यात सावकार महिलेकडून तब्बल ८ लाखांवर वसुली केल्याच्या तक्रारी आहेत. या प्रकरणात दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. पुरावे तसेच उर्वरित कर्जदारांची सुनावणी अद्याप बाकी आहे.

- सुरेखा फुपाटे, तालुका उपनिबंधक

तिचा इतका धाक होता, की दूध विक्रीसाठी रात्री यायचो

सुनावणीसाठी आलेल्या एका कर्जदार शेतकऱ्याने सांगितले, की सावकार महिलेने व्याजाच्या पैशासाठी खूप छळ केला, पैसे परतफेड केल्यानंतरही जमीन बळकावली. वारंवार विनंती करण्यासाठी आलो, की धमक्या देत असे. गुंड पाठवून अनेकदा कामात व्यत्यय आणला जात होता.

या महिलेच्या धाकाने गेवराईहून शहरात दूध विक्रीसाठी येताना अंधार झाल्यानंतर यावे लागत असे, इतका तिचा धाक होता, या शब्दात सुनावणी दरम्यान शेतकऱ्याने अधिकाऱ्यांसमोर करुण कहाणी कथन केली.

  • कर्जदाराने सांगितली सावकार महिलेने केलेल्या छळाची कहाणी

  • अवघ्या साठ हजारांच्या कर्जासाठी तिने हडपली दोन एकर जमीन

  • गुंड पाठवून द्यायची धमक्या, घरात सापडली १२५ खरेदीखते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com