पाच महिन्यांत ९९ वाळूमाफियांवर गुन्हे
जिल्ह्यात २६७ वाहने जप्त; सहा कोटींचा दंड, दोन कोटी वसूल
जालना, ता.९ : जिल्ह्यात गौण खनिजांचे अवैध उत्खनन, वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांवर महसूल प्रशासनाने कारवाया केल्या आहेत. गेल्या पाच महिन्यांत जिल्ह्यात अवैध उत्खनन व वाहतुकीप्रकरणी ९९ गुन्हे दाखल करून २६७ वाहने जप्त करण्यात आली. या कारवायांमध्ये सहा कोटींचा दंड ठोठावण्यात आला. दोन कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. विशेषतः अंबड आणि जाफराबाद तालुक्यांत सर्वाधिक गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यातील नदीपात्रांमधून वाळूचा अवैध उपसा करून त्याची वाहतूक करण्याचे प्रकार सुरू असल्याचे वास्तव ‘सकाळ’ने ‘कुठेय तलाठी?’ या वृत्तमालिकेतून समोर आणले होते. दरम्यान, या मालिकेचा परिमाण म्हणून गेल्या पाच महिन्यांत महसूल विभागाच्या पथकांकडून विविध ठिकाणी तपासणी आणि धडक कारवाया करण्यात येत आहेत. वाळूची वाहतूक करणारी वाहने पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. गेल्या पाच महिन्यांत अवैध उत्खनन आणि वाहतुकीचे २७१ प्रकरणे घडली असून यामध्ये ९९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच २६७ वाहने जप्त केले असून २ कोटींची दंडात्मक रक्कम आकारण्यात आली आहे. दरम्यान, काही प्रमाणावर वाहने जप्त झाल्याने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना चाप बसला आहे. मात्र, कारवाईनंतरही काही भागांतून चोरी छुप्या पद्धतीने वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महसूल विभागासमोर अवैध वाळू उपसा पूर्णपणे रोखण्याचे आव्हान कायम आहे.
---
इन्फो :
अंबड-जाफराबादमध्ये सर्वाधिक कारवाया
जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत अंबड आणि जाफराबाद तालुक्यांत अवैध वाळू प्रकरणी सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये जाफराबाद २८, अंबड २३, जालना ४, बदनापूर ११, घनसावंगी १४, परतूर ४, मंठा ३, भोकरदन १२ असे एकूण ९९ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
----
कोट :
महसूल व पोलिस विभाग जिल्ह्यातील गौण खनिजांचे अवैध उत्खनन, वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. यामध्ये आढळून येणाऱ्या दोषींवर फौजदारी व दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविली जाणार असून, नागरिकांनीदेखील त्यांच्या परिसरात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांची माहिती प्रशासनास द्यावी.
- आशिमा मित्तल, जिल्हाधिकारी