esakal | अखेर ‘ते’ फार्महाऊस केले सील, खासदारांवर मात्र कारवाई नाहीच
sakal

बोलून बातमी शोधा

imtiaz jalil

अखेर ‘ते’ फार्महाऊस केले सील, खासदारांवर मात्र कारवाई नाहीच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: एकीकडे कोरोनाचे संकट अजूनही गडद आहे. त्यात डेल्टा प्लसची लाट उसळण्याची शक्यता वर्तविली जात असताना खुद्द लोकप्रतिनिधी असलेले खासदार इम्तियाज जलील यांच्याकडूनच कोरोनाच्या अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या नियमांना पायदळी तुडविल्याचा प्रकार शनिवारी (ता.तीन) रात्री समोर आला होता. दौलताबादेत फार्म हाऊसवर पार पडलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता सोमवारी (ता.५) ‘ते’ फार्म हाऊस सील करण्यात आले. या प्रकरणी ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, कव्वालीदरम्यान खासदार इम्तियाज यांच्यावर पैसे उधळण्यात आल्याने गर्दी झाली तरी, त्यांच्याविरोधात कारवाई न झाल्याने कायदा केवळ सामान्यांसाठीच आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटनेनंतर आता कुठे या परिस्थितीतून शहर सावरायला लागले आहे. एकीकडे तिसऱ्या लाटेची भीती आहे. अशी परिस्थिती असताना वीकेंड लॉकडाउनमध्ये मध्यरात्रीपर्यंत कोरोनाचा नियम न पाळता कव्वालीचा फड रंगला तसेच उपस्थितांनी पैशांची उधळण केली होती. विकेंड लॉकडाऊन असतानाही खुद्द खासदारांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री बारापर्यंत दौलताबादेतील अब्दीमंडीजवळील एका फार्म हाऊसवर कव्वालीचा कार्यक्रम रंगला. कुणाच्याही तोंडाला मास्क नव्हता. या प्रकरणी आयोजक एमआयएमचे जिल्हाध्यक्ष समीर साजेद बिल्डर, माजी नगरसेवक नासेर सिद्दिकी, सोहेल जकीऊद्दीन, फार्म हाउसचे रतीक खान कलीम खान यांच्यासह ५०- ६० जणांवर गुन्हा दाखल झाला मात्र खासदारांविरोधात कारवाई झाली नाही.

हेही वाचा: Corona Updates: मराठवाड्यात नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट

या प्रकरणात पोलिसांनी तिसऱ्या दिवशी कारवाईचे एक पाऊल टाकत संबंधित अंबर फार्म हाऊस सील केले आहे. सदर फार्म हाऊस अब्दीमंडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते. त्यानुसार मंडळ अधिकारी भाऊसाहेब घुसिंगे (सजा माळीवाडा) यांना लेखी अहवाल दिल्यानंतर सोमवारी सायंकाळी साडेसहा ते पावणे सात वाजेदरम्यान दोन पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला आणि फार्महाऊस पुढील आदेशापर्यंत मंडळ अधिकारी आणि टीमकडून सील करण्यात आले आहे. ही कारवाई निरीक्षक राजश्री आडे, सरपंच साबेर खान, श्री. घुसिंगे, ग्रामविकास आधिकारी ओ. पी. चव्हाण, पोलिस नीलेश पाटील, श्री. शरद, तलाठी मधूकर मुळे यांच्या चमूने केली.

कव्वाली प्रकरणी फार्म हाऊसच्या मालकाला आरोपी करण्यात आले आहे. तसेच मंडळ अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रावरुन सील करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीकडून फार्म हाऊसमालकाला नियमानुसार दंड होईल.
-राजश्री आडे, पोलिस निरीक्षक, दौलताबाद

loading image