

Illegal Sand Mining Maharashtra
esakal
नितीन चव्हाण
बीड : हायवाला कधी पावती नसते... आम्ही गेवराईचे पाटील आहोत, तुला बघून घेऊ, तुझं घर आम्हाला माहितीये! अशा फिल्मी आणि अरेरावीच्या भाषेत वाळू माफियांनी चक्क सरकारी कामात अडथळा आणून महसूल पथकालाच 'लाईव्ह' धमकी दिली. राक्षसभुवन फाट्यावर घडलेल्या या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, वाळू माफियांची दहशत आता थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली आहे.
महसूल विभागाचे तलाठी राम जाधव आणि मंडल अधिकारी दत्तात्रय शेंबडे यांचे पथक ५ मार्च रोजी दुपारी घरकुल वाळू वाटपाच्या तपासणीसाठी तैनात होते. त्याच वेळी एक पिवळ्या रंगाचा विना नंबरचा 'भारत बेंझ' हायवा ५ ब्रास अवैध वाळू घेऊन येताना दिसला. पथकाने गाडी अडवली आणि पास मागितला, पण पास तर नव्हताच, उलट तिथे 'भाईगिरी'चा थरार सुरू झाला. गाडी अडवल्याचा निरोप मिळताच स्वप्नील मोटे नावाचा व्यक्ती आपल्या ७-८ साथीदारांसह काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ आणि पांढऱ्या स्विफ्टमधून तिथे धडकला.