
छत्रपती संभाजीनगर : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शहरासह जिल्ह्यात विकसित भारत यात्रा सुरू करण्यात आली. या यात्रेत सहभागी होऊन तत्काळ लाभ घ्या, असे आवाहन केले जात आहे. पण, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या कार्ड वाटपचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. या योजनेत जिल्ह्यात २३ लाख २९ हजार ४२४ लाभार्थी आहेत. पण, प्रत्यक्षात सहा वर्षांत केवळ पाच लाख १५ हजार लाभार्थींनाच कार्ड मिळाले आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड लिंक नसल्याने लाभार्थींना कार्ड मिळत नसल्याचे चित्र आहे.
केंद्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार करण्यासाठी भाजपतर्फे सध्या विकसित भारत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शहराच्या विविध भागात ही यात्रा जात असून, नागरिकांना विविध योजनांचा लाभ जागेवर घेण्याचे आवाहन नेते मंडळी, अधिकारी करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र चित्र उलट असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत प्रशासनाकडे लाभार्थींच्या याद्या असून, त्यांना कार्ड वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. मात्र, जिल्ह्यात २३ लाख २९ हजार ४२४ लाभार्थी असताना प्रत्यक्षात सहा वर्षांत पाच लाख १५ हजार लाभार्थींनाच हे कार्ड आतापर्यंत मिळाले आहे. त्यामुळे १८ लाख १४ हजार २९९ नागरिक कार्डापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे राज्यात छत्रपती संभाजीनगरचा यात ३३ वा क्रमांक आहे. शहरात केंद्र शासनाचे दोन मंत्री तर राज्याचे तीन मंत्री राहतात. त्यासोबत विधान परिषदेचे विरोधीपक्षनेतेही राहतात. पण, योजना अद्याप जनतेपर्यंत पोचलेली नाही, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गडचिरोली सारख्या दुर्गम भागात अधिक काम झाले आहे, हे विशेष.
दहा जणांची टीम
कार्ड वाटपाच्या कामाला गती देण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी बैठक घेऊन त्यात प्रत्येक तालुकानिहाय १० जणांची समिती तयार करण्यात आली. त्यात ग्रामीण भागात तहसीलदार तर शहरात उपायुक्तांना प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यानंतरही या कामाला गती मिळाली नसल्याचे चित्र आहे.
लाभासाठी मनस्ताप
या योजनेसाठी केशरी व पिवळे रेशन कार्डधारक पात्र आहेत. त्यांना पाच लाखापर्यंतचे उपचार धर्मादाय रुग्णालयांत मिळतात. त्यानुसार अनेक जण रेशन कार्ड, आधार कार्ड घेऊन नोंदणी करण्यासाठी येतात. पण रेशनकार्डवर १० आकडी नंबर नसल्याने म्हणजेच ई-केवायसी नसल्याने १०० पैकी ८० जणांना नोंद करता येत नाही. त्यांचे ई-केवायसी करण्यासाठी महाईसेवा केंद्रांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे कार्ड देण्याची मोहीम काही कारणांमुळे मंद झाली होती. पण, आता त्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे गतीने कार्ड दिले जात आहेत. त्याचा फायदा रुग्णांना होत असून, दीड महिन्यात सुमारे दीड लाख कार्ड लाभार्थींना देण्यात आले आहेत. रेशनकार्ड आणि आधारकार्डचे ई-केवायसचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
— डॉ. रवी भोपळे,
वरिष्ठ जिल्हा समन्वयक, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.