रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी रुग्णालयांत स्वतंत्र कक्ष
----
उपचारांतील चुका, संसर्ग रोखण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे निर्देश
-----
परभणी, ता. २० : रुग्णालयांमध्ये उपचारांदरम्यान होणाऱ्या चुका, औषधोपचारातील निष्काळजीपणा व रुग्णालयीन संसर्ग रोखण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांच्या संलग्न रुग्णालयांमध्ये स्वतंत्र रुग्ण सुरक्षा कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या माध्यमातून रुग्णांच्या सुरक्षिततेसाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी, देखरेख आणि नियमित तपासणी केली जाणार आहे.
रुग्णालयांमध्ये चुकीची औषधे देणे, उपचारांदरम्यान चुका होणे, शस्त्रक्रियेतील त्रुटी आणि संसर्गाचा प्रसार या बाबी रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर मानल्या जातात. अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी रुग्ण सुरक्षा कक्षाच्या माध्यमातून विविध विभागांमध्ये समन्वय साधला जाणार आहे. या निर्णयामुळे परभणीतील वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयातील आरोग्यसेवांचा दर्जा सुधारण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
-----
स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निर्देशानुसार, संबंधित वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये रुग्ण सुरक्षा कक्ष कार्यान्वित करावा लागणार आहे. या कक्षाच्या कामकाजाचे नियोजन आणि समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. उपचार, परिचर्या, औषध व्यवस्थापन आणि संसर्ग नियंत्रण या विभागांमध्ये समन्वय राखण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यावर असेल. रुग्णालयात घडणाऱ्या सुरक्षाविषयक घटनांची नोंद करणे, त्यामागील कारणांचा अभ्यास करणे आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना सुचविणे, ही या व्यवस्थेची प्रमुख कामे असतील. तसेच वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देणे, उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे आणि संबंधित समितीसमोर नियमित अहवाल सादर करणे यावरही भर दिला जाणार आहे.
-----
सुरक्षित उपचारांवर भर
रुग्णाची योग्य ओळख पटविणे, औषधोपचारात अचूकता राखणे, संसर्गाचा प्रसार रोखणे आणि शस्त्रक्रिया सुरक्षितपणे पार पाडणे, या बाबींना प्राधान्य दिले जाणार आहे. उपचारांदरम्यान घडणाऱ्या प्रतिकूल घटनांची नोंद ठेवून त्यांचे विश्लेषण केले जाईल. त्यातून उपचार पद्धतीतील त्रुटी शोधून त्या दूर करण्यास मदत होईल.