(फोटो ः ABD26J79776)
((((फोटो ओळ)))) सातारा परिसर : उद्यम विकसित मराठवाडा अभियानात बोलताना डॉ. उमेश कांबळे. व्यासपीठावर (डावीकडून) दीपक गवळी, बी.एस. खोसे, राम भोगले, मुनीष शर्मा, महेश डोंगरे आदी.
---
शेती वाढवायची असेल, तर आधी उद्योग वाढवा
---
राम भोगले ः ‘उद्यम विकसित मराठवाडा’ अभियानास प्रारंभ
---
सातारा परिसर, ता. १७ : ‘शेतीचा विकास करायचा असेल, तर आधी उद्योगांची वाढ झाली पाहिजे. मराठवाड्यात कमी गुंतवणुकीत प्रक्रिया उद्योग उभारण्याची मोठी संधी उपलब्ध असून, मका आणि बायोमासपासून ऊर्जा निर्मितीसाठी युरोपीय तंत्रज्ञानाचा अभ्यास सुरू आहे’, असे मत ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांनी व्यक्त केले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून ‘सीएएमबी’तर्फे ‘एमआयटी’ येथे ‘उद्यम-विकसित मराठवाडा’ अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर ताशेरे ओढताना भोगले म्हणाले, ‘‘मोठ्या अर्थसंकल्पीय तरतुदींनंतरही केवळ अनुदान लाटायचे आणि उद्योग उभा करायचा नाही, ही समाजातील मोठी खंत आहे.’’
सीएएमबीचे सरचिटणीस डॉ. उमेश कांबळे यांनी मराठवाड्यात उद्योजकता रुजावी यासाठी हा उपक्रम सलग पाच वर्षे दर दोन महिन्यांनी राबवला जाणार असल्याचे सांगितले. एमआयटीचे महासंचालक मुनीष शर्मा यांनी कापसाच्या हेक्टरी उत्पादकतेवर भर दिला.
दरम्यान, कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांचा सन्मान करण्यात आला. ‘पीएमएफएमई’ योजनेत जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असून, सुमारे १,१०० कोटी रुपये महिला आणि शेतकऱ्यांवर खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय मराठवाड्यात रेशीम कोष उत्पादनाचा वाटा ६० टक्के असला, तरी त्यावर प्रक्रिया मात्र बाहेरगावी होते, हा विरोधाभास महाराष्ट्र सिल्क असोसिएशनचे राजेश उरकुडे यांनी मांडला.
दिवसभरात पार पडलेल्या विविध सत्रांमध्ये हवामान बदल, कृषी आव्हाने, पाणी व औद्योगिक विकास, शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्ता, चारा पिकांमधील संधी तसेच मूल्यवर्धित निर्यातीवर सविस्तर चर्चा झाली.