इनोव्हा कारसह सव्वातीन
लाखांची रोकड पळवली!
----
छत्रपती संभाजीनगर, ता. ३ : इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टरला तब्बल १२ कोटी रुपयांच्या कमिशनची मागणी करत १० ते १२ गुंडांनी धमकावून त्यांची १५ लाख रुपये किमतीची इनोव्हा कार आणि ३ लाख २५ हजार रुपयांची रोकड पळवून नेल्याची धक्कादायक घटना चिकलठाणा एमआयडीसी परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दोन मुख्य संशयितांसह इतर गुंडांविरुद्ध जबरी चोरी, खंडणी व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.
फिर्यादी ज्ञानेश्वर दादासाहेब बारे (वय ३४, रा. शाश्वत रेसिडेन्सी, ईटखेडा, पैठण रोड) हे इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर म्हणून व्यवसाय करतात. संशयित आरोपी राहुल चाबुकस्वार हा बारे यांच्याकडे १२ कोटी रुपये कमिशन देण्यासाठी सतत दबाव टाकत होता. ३० सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास बारे हे चिकलठाणा एमआयडीसी येथील महिंद्रा शोरूममागील आर्किटेक्ट भूषण जोशी यांच्या कार्यालयाजवळ असताना आरोपींनी पाठवलेल्या १० ते १२ गुंडांनी त्यांना गाठले. गुंडांनी फिर्यादीला धमकावून त्यांची सुमारे १५ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार (एमएच २० एफयू ७०००) आणि कारमध्ये ठेवलेली ३ लाख २५ हजार रुपयांची रोख रक्कम बळजबरीने ताब्यात घेऊन पोबारा केला. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, ते दबावाखाली येऊन शरण यावेत आणि सांगितल्याप्रमाणे वागावेत म्हणून सुधीर कातकडे व राहुल चाबुकस्वार यांच्या सांगण्यावरूनच हा कट रचण्यात आला होता. लुटलेली कार व रोख रक्कम आरोपींनीच लपवून ठेवल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.