आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणात
दोन शास्त्रज्ञ सहभागी
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. १२ ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील दोन शास्त्रज्ञांनी संवर्धनशील व पुनरुज्जीवनशील शेती या विषयावरील १४ व्या प्रगत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या शिफारशीनुसार आंतरराष्ट्रीय मका व गहू सुधारणा संस्थेमार्फत या शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली. यात छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सूर्यकांत पवार, सहायक प्रा. डॉ. सुरेखा कदम यांचा समावेश आहे. २८ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित तीन आठवड्यांच्या प्रशिक्षणात भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश या चार देशांतील २० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय मका व गहू सुधारणा केंद्र, बोरलॉग इन्स्टिट्यूट फॉर साऊथ एशिया आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मृदा आरोग्य संवर्धन, पीक अवशेष व्यवस्थापन, नैसर्गिक संसाधनांचे जतन, पाणी व खतांचा कार्यक्षम वापर आणि हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणादरम्यान डॉ. सूर्यकांत पवार यांनी विद्यापीठातील हवामान बदलविषयक संशोधन व संवर्धनशील शेती प्रयोगांचे सादरीकरण केले. या निवडीबद्दल कुलगुरू डॉ. इंद्र मणी, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. या प्रशिक्षणाचा मराठवाड्यातील शाश्वत व हवामान अनुकूल शेतीच्या विकासासाठी लाभ होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
-----------