
फुलंब्री : बदलत्या काळानुसार स्त्रीची भूमिका बदलली असून स्त्री सुद्धा आता खऱ्या अर्थाने पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असल्याचे चित्र फुलंब्री तालुक्यात असून येथील तहसीलदारांसह, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, ठाणे प्रमुख, सभापती, वैद्यकीय अधिकारींसह तब्बल ११८५ महिला तालुक्याचा कारभार चालवीत आहे. यावरुन आजच्या महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नसल्याचे दिसून येते.
आज साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त महिलाशक्तीचा आढावा घेतला असता अवघ्या तालुक्यावर नारीशक्तीचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले. येथील तहसीलदार म्हणून डॉ.शीतल राजपूत, पंचायत समिती गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, पंचायत समिती सभापती सविता फुके, वडोद बाजार पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक आरती जाधव, नगरपंचायत मुख्याधिकारी नंदा गायकवाड, नगरपंचायतीच्या बालकल्याण सभापती अश्विनी जाधव, उपसभापती रत्ना सोनवणे, राष्ट्रीय नेमबाज गीता म्हस्के, तेजस्विनी मुळे, कराटे खेळाडू राजनंदिनी जाधव आदी महिला प्रमुख कार्यालयात नारीशक्तीच बोलबाला असून अधिकारींसह महिला पदाधिकारी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या परिसराचे प्रभावी नेतृत्व करीत आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयातही तब्बल ३६ सरपंच आपल्या गावाचा कारभार सांभाळत असून ३५ आरोग्य सेविका/सहायिका, १२७ आशा कार्यकर्ती आपले कर्तव्य बजावत असून दुसरीकडे तालुक्यात ४६२ महिला शिक्षिका देशासाठी विद्यार्थी घडविण्याचे काम करीत आहेत. तसेच ०७ महिला ग्रामसेवक तालुक्यातील गावांमध्ये सेवा देत असून ०८ महिला तलाठीसुद्धा आपापल्या सजाची जबाबदारी योग्यरीत्या सांभाळत आहे. त्याचबरोबर तालुक्यात तब्बल ४८९ अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस बालकांची काळजी घेत आहेत. तसेच येथील वडोद बाजार ठाण्याचा कारभार सहायक पोलिस निरीक्षक आरती जाधव यांच्या हाती असून येथे संरक्षणाची जबाबदारी १५ महिला पोलिस कर्मचारी पार पाडत असल्याचे चित्र आहे, अशा प्रकारे एकूण ११८५ महिलांच्या हाती तालुक्याचा कारभार असून यामुळे खऱ्या अर्थाने तालुक्यात महिलाराज सुरु असल्याचे चित्र आहे.
महिला अधिकारी कर्मचारी व पदाधिकारी
तहसीलदार ०१
गटविकास अधिकारी ०१
नगरपंचायत मुख्याधिकारी ०१
सहायक पोलिस निरीक्षक ०१
वैद्यकीय अधिकारी ०४
राष्ट्रीय नेमबाज खेळाडू ०२
महिला सरपंच ३६
आरोग्य सेविका/ सहायिका ३५
आशा कार्यकर्ती १२७
महिला शिक्षिका ४६२
महिला ग्रामसेवक ०७
महिला तलाठी ०८
अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस ४८९
वडोद बजार व फुलंब्री महिला पोलिस कर्मचारी १५
''शहरी भागातील पालक आपल्या मुलींना उच्च शिक्षण देतात. त्याच धर्तीवर ग्रामीण भागातील पालकांनीही मुला-मुलीत भेदभाव न करता मुलींना चांगले शिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनवावे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील मुलींचा बाल विवाह रोखण्यासाठी घरा-घरातील आईंनी पुढाकार घ्यायला हवा. जेणे करून खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा होईल.''
- अनुराधा चव्हाण, सभापती महिला व बालकल्याण जि. प.औरंगाबाद.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.