नाफे उर्दू शाळेतील शिक्षकाची
गैरहजेरी, वेतनाची चौकशी होणार
हिंगोली, ता. १८ (बातमीदार) ः येथील पेन्शनपुरा भागातील नाफे उर्दू प्राथमिक शाळेतील एका सहशिक्षकाच्या सततच्या गैरहजेरीची आणि शासन अनुदानातून उचलल्या जाणाऱ्या वेतनाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकारी मंजुश्री कल्लोवाड यांनी दिले आहेत. या प्रकरणी प्रत्यक्ष शाळेत जाऊन तपासणी करावी आणि पुढील सात दिवसांत चौकशी अहवाल सादर करावा, असे लेखी पत्र त्यांनी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना मंगळवारी (ता. १७) बजावले आहे.
नाफे उर्दू प्राथमिक शाळेतील संबंधित सहशिक्षक शाळेत नियमित उपस्थित न राहता परस्पर वेतनाचा लाभ घेत असल्याची लेखी तक्रार सय्यद जावेद सय्यद बाबू यांनी ५ नोव्हेंबर रोजी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत शिक्षणाधिकारी कल्लोवाड यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळेस प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा हजेरीपट, रजा नोंदवही, वेतन देयके आणि इतर मूळ दप्तराची सखोल तपासणी करावी; तसेच संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि तक्रारदार यांचे लेखी खुलासे व जबाब नोंदवून सात दिवसांच्या आत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे