आयटी इकोसिस्टीमसाठी पाहिजे
योग्य धोरण आणि पायाभूत सुविधा
---------------------
((मुख्य इन्ट्रो))
ग्रोनिव्हा कार्पोरेशन प्रा.लि. कंपनीचे संचालक सचिन काटे हे मूळचे सोनपेठमधील धार दिघोळचे. शिक्षणासाठी त्यांनी २००१ मध्ये छत्रपती संभाजीनगर जवळ केले. देवगिरी कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. नंतर ‘व्हिडिओकोन’मध्ये एक वर्ष काम केलं. पण इथे त्यांचे मन रमले नाही. स्वतः काही तरी वेगळे करण्याच्या जिद्द होती. यातून त्यांनी कंपनी सुरू करण्याचा विचार केला, त्याला २००९ मध्ये मूर्रतरूप दिले. सुरवातीला केवळ वेबसाइट व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची सेवा देणाऱ्या ग्रोनिव्हा कंपनीची आता परदेशातही ओळख निर्माण झाली असून, यूएसमध्ये ऑफिस सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली.
------------
छत्रपती संभाजीनगर शहरात आयटी क्षेत्रासाठी मोठी संधी आहे; पण त्यासाठी योग्य धोरण, पायाभूत सुविधा आणि एकत्रित नियोजन हवे. स्वतंत्र आयटी पार्क, आवश्यक जमीन उपलब्ध करून दिली आणि उद्योगांना प्रोत्साहन देणारी धोरणे राबविली, तर संभाजीनगरमध्ये आयटी क्षेत्राचा वेगाने विस्तार होऊन त्यावर आधारित इकोसिस्टीम तयार होऊ शकेल, असा विश्वास आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या ग्रोनिव्हा कार्पोरेशन प्रा.लि. कंपनीचे संचालक सचिन काटे यांनी व्यक्त केला.
----
‘शहरात आयटी क्षेत्राशी संबंधित ६० पेक्षा अधिक कंपन्या आहेत. त्यांच्याकडे ३ हजार ५०० ते चार हजार कर्मचारी आहेत. या कंपन्यांमध्ये वेब डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर सोल्युशन्स, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, सपोर्ट, ॲनालिटिक्स अशा विविध सेवा दिल्या जातात. पण, या कंपन्या एकाच ठिकाणी नाहीत. त्या विविध भागांत विखुरलेल्या आहेत. त्यामुळे या उद्योगाची ओळख व्यापक स्तरावर निर्माण झालेली नाही. त्यासाठी आयटी पार्क हवा. पण, ही केवळ इमारत नसावी, तर पूर्ण परिसंस्था असली पाहिजे. इंटरनेट, वीज, रस्ते, हवाई कनेक्टीव्हिटी अशा मूलभूत सुविधा शहरात बऱ्यापैकी उपलब्ध आहेत. उरते ते फक्त नियोजन आणि प्राधान्य. संभाजीनगरला खऱ्या अर्थाने आयटी हब बनायचे असेल, तर एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. सरकार, स्थानिक प्रतिनिधी, उद्योग संस्था आणि उद्योजक यांनी मिळून काम केले, तर आयटी पार्क आणि डेटा सेंटरसारखे प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकतात. पुढील एक ते दीड वर्षांत जर अशा पातळीवर नियोजन झाले, तर शहराला मोठा फायदा होऊ शकतो’, असेही ते म्हणाले.
आयटी पार्कची गरज का?
छत्रपती संभाजीनगरमध्ये आयटीसाठी स्वतंत्र पार्क असणे ही केवळ मागणी नाही, तर ती भविष्यासाठीची गरज आहे. इतर उद्योगांना जशा सवलती, जमीन आणि सुविधा मिळतात, तशाच सुविधा आयटी क्षेत्रालाही दिल्या पाहिजेत. आयटीसाठी जागा उपलब्ध करून दिली, तर कंपन्यांना एकत्र येणे सोपे जाईल. आज परिस्थिती अशी आहे, की क्षमता असलेले तरुण-तरुणी पुणे, मुंबई, बंगळूर, दिल्लीसारख्या शहरांकडे स्थलांतर करतात. शहराला टीयर-२ किंवा टीयर-३ श्रेणीतील इतर शहरांशी स्पर्धा करायची असेल तर अशा सुविधा अत्यावश्यक आहेत, असे काटे यांनी नमूद केले.
डेटा सेंटरची शक्यता आणि मर्यादा
संभाजीनगरमध्ये डेटा सेंटर उभारण्याची क्षमता आहे का, यावर उद्योग जगतामध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे. परंतु, डेटा सेंटरसाठी सर्वांत मोठी गरज आहे, ती पाणी आणि तापमान नियंत्रणाची; कारण डेटा सेंटरमधील यंत्रणा सतत चालू असते. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर कूलिंग लागते. शहरात सध्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. शहरात अनेकदा नियमित पाणीपुरवठा होत नाही. अशा स्थितीत डेटा सेंटरसाठी आवश्यक असणारे पाणी उपलब्ध करून देणे, हे मोठे आव्हान ठरू शकते. डेटा सेंटर उभारल्यास केवळ तांत्रिक गुंतवणूकच नाही, तर मोठ्या प्रमाणावर रोजगारही निर्माण होईल. अनेक स्तरांवर कामाची संधी उपलब्ध होईल. त्यामुळे शहराच्या अर्थव्यवस्थेला एक नवा आधार मिळू शकतो, असेही काटे म्हणाले.
-------
एआयमुळे बदलांची नांदी
काटे म्हणाले, ‘जगभरातील आयटी उद्योगावर सर्वाधिक परिणाम आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे होत आहे. एआयमुळे आयटी क्षेत्राचे स्वरूप झपाट्याने बदलले. पुढील काही वर्षांत कोडिंग, बॅकएंड डेव्हलपमेंट आणि काही प्रकारची मॅन्युअल विश्लेषणात्मक कामे कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचा अर्थ रोजगार संपतील असा नाही; तर रोजगारांचा प्रकार बदलेल. पूर्वी ज्यासाठी आठ ते दहा जण लागत होते, त्यातील काही कामे आता २ ते ३ तज्ज्ञांनी पूर्ण करता येतात. पण, प्रॉडक्ट मॅनेजमेंट, सपोर्ट, कस्टमर रिलेशन, इम्प्लिमेंटेशन, डेटा इंजिनिअरिंग आणि एआय ऑपरेशन्स अशा क्षेत्रांमध्ये संधी निर्माण होत राहतील’, असेही त्यांनी सांगितले.
------
कौशल्याधारित जॉब मार्केटकडे वाटचाल
पूर्वी केवळ पदवी, चांगले कॉलेज किंवा विशिष्ट टेक्निकल पार्श्वभूमीवर नोकरी मिळण्याची शक्यता जास्त होती. पण, यापुढे ज्यांच्याकडे कौशल्य आहे, विश्लेषणक्षमता आहे, समस्या सोडवण्याची बुद्धी आहे त्यांनाच पुढे संधी मिळणार आहे. एआयमुळे प्राथमिक पातळीवरची बरीच कामे स्वयंचलित झाली. सुरवातीच्या स्तरावर नोकऱ्या कमी मिळू शकतात. मात्र, ज्या व्यक्ती स्वतःमध्ये सातत्याने सुधारणा करतील, एआय टूल्स समजून घेतील, नवीन तंत्रज्ञान स्वीकारतील, त्यांच्यासाठी भविष्यातील दारे उघडी राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
-------
इन-हाऊस विरुद्ध आउटसोर्सिंगचा नवा विचार
अनेक कंपन्या पूर्वी ज्या सेवा आउटसोर्स करत होत्या, त्या सेवा स्वतःच्या इन-हाऊस टीमकडून करून घेत आहे; कारण एआयच्या मदतीने काही कामे जलद आणि कमी खर्चात करता येतात. पण, दीर्घकालीन दृष्टीने प्रत्येक कंपनीला सर्व काही स्वतः करण्यापेक्षा तज्ज्ञांकडून काम करून घेणे जास्त फायदेशीर ठरू शकते. यामुळे आयटी सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी पुढील काही वर्षे आव्हानात्मक असतील. मात्र, संधीही तितक्याच मोठ्या आहेत.
-------
ग्रोनिव्हाचे ऑफिस आता यूएसमध्ये
ग्रोनिव्हा कंपनीविषयी माहिती देताना ते म्हणाले, वर्ष २००९ मध्ये सुरू झाली. प्रारंभी वेबसाइट व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेवा देत होती. २००९ ते २०११ या काळात त्यांनी सुमारे ४०० वेबसाइट तयार केल्या. नंतर त्यांनी प्रॉडक्ट डेव्हलपमेंटकडे वळून ट्रान्सपोर्टेशन डोमेनमध्ये प्रॉडक्ट तयार केले आणि कार रेंटल सोल्युशन २०१९ पर्यंत चालवले. कोविडनंतर त्यांनी एचार मॅनेजमेंट प्रॉडक्ट विकसित केले. सध्या कंपनीकडे ९० लोकांची टीम आहे. भारतीय ग्राहकांकडून ८५ टक्के तर उर्वरित परदेशातून महसूल येतो. अलीकडेच आम्ही यूएसमध्ये ऑफिस सुरू केले असून, फिनटेक आणि कॉम्प्लायन्स क्षेत्रातही विस्तार करत आहोत. २००९ ते २०११ या काळात सुमारे ४०० वेबसाइट तयार केल्या. नंतर प्रॉडक्ट डेव्हलपमेंटकडे वळून ट्रान्सपोर्टेशन डोमेनमध्ये प्रॉडक्ट तयार केले आणि कार रेंटल सोल्युशन २०१९ पर्यंत चालवले. कोविडनंतर एचार मॅनेजमेंट प्रॉडक्ट विकसित केले, अशी माहिती सचिन काटे यांनी दिली.