छायाचित्र स्पर्धेत शासकीय आयटीआयला द्वितीय क्रमांक
परभणी, ता. ८ : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने आयोजित छायाचित्र स्पर्धेत येथील गोंधळ महर्षी राजाराम बापू कदम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने यश मिळविले. संस्थेने प्रादेशिक स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयोजित स्पर्धेत संस्थेतील कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला. स्पर्धेसाठी सादर करण्यात आलेली छायाचित्रे कलात्मक, कल्पक आणि सृजनशीलतेचा उत्तम नमुना ठरली. तंत्रज्ञान आणि कलेचा सुरेख संगम साधत सादर केलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांमुळे परभणीच्या संस्थेला प्रादेशिक स्तरावर द्वितीय क्रमांकाचा बहुमान मिळाला.
उल्लेखनीय यशाबद्दल व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी यांच्या डिजिटल स्वाक्षरीचे ‘कृतज्ञता प्रमाणपत्र’ तसेच तीन हजार रुपयांचे रोख पारितोषिक संस्थेला देण्यात आले. स्पर्धकांना गटनिदेशक सुनील वाकोडकर, पेंटर विभागप्रमुख प्रकाश बनाटे, तासिका निदेशक कृष्णा उकंडे आणि अमोल टाके यांनी मार्गदर्शन केले. यशाबद्दल प्राचार्य विकास आडे, प्रबंधक रामकिशन देशमुख, कार्यालयीन अधीक्षक विष्णुपंत कमळकर, गोपाळ घायाळ, भगवान काळे, मधुकर ब्राह्मणे, भाऊराव वाणी, सुशील वाकोडकर, संदीपान वाघमारे, रमाकांत लोखंडे, संतोष नालंदे, गणेश ठिगळे, श्रीकांत टिपरसे, प्रशांत भुसारे, संतोष चौधरी, उषा गवई, प्रज्ञा निकम, राधिका कुलकर्णी आणि प्रतीक्षा बालटकर यांनी अभिनंदन केले.