देवस्थानची जमीन हडपणाऱ्यांना कोणाचे अभय?
जाधवाडीतील बेकायदा प्लॉटिंग ः पोलिसांपुढे महापालिका हातघाईला
जाधववाडी, ता. १६ : जाधववाडी परिसरातील श्रीराम मंदिर संस्थान व बालाजी मठाच्या वर्ग-२ च्या ४१ एकर जमिनीवरील अनधिकृत प्लॉटिंग आणि भूखंड विक्री प्रकरणी दीड महिन्यानंतरही गुन्हा दाखल झालेला नाही. महापालिका अधिकारी कागदपत्रांची पूर्तता करताना हातघाईला आली असून, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाची पोलिस वाट पाहत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जाधववाडी येथील बाजार समितीसमोरील श्रीराम मंदिर संस्थान आणि बालाजी मठाच्या गट क्रमांक १२४ व १२५ मधील ४१ एकर देवस्थान जमिनीवर अनधिकृत प्लॉटिंग करून भूखंडांची विक्री करण्यात आली. श्री रामानंद बिल्डरचे मुकुंद कुलकर्णी यांनी पाच ते सात हजार रुपये प्रतिचौरस फूट दराने बॉण्डवर भूखंड विकल्याची माहिती समोर आली होती. यातील ८० ते ८५ टक्के भूखंडांची विक्री झाल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणी तक्रार झाल्यानंतर ३० सप्टेंबरला महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई करून प्लॉटिंग उद्ध्वस्त केली. मात्र, संबंधितांवर गुन्हा नोंद झाला नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी वारंवार एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात चकरा मारत आहेत. पण पंचनाम्यामध्ये त्रुटी आहेत. कागदपत्र अर्धवट आहेत, अशी कारणे देऊन गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत हाताळले जात असून, त्यांच्या आदेशाची वाट पोलिस ठाण्याचे अधिकारी पाहत आहेत. त्यामुळे कोणता वरिष्ठ अधिकारी देवस्थानची जमीन बेकायदा विक्री करणाऱ्या भूमाफियांना पाठीशी घालत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
-------