‘जागर स्त्री कर्तृत्वाचा’ ऑनलाइन
व्याख्यानमालेचा शेंद्रा येथे समारोप
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. २२ ः शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भागीरथी त्र्यंबकराव ढगे सार्वजनिक वाचनालय, शेंद्रा यांच्यातर्फे आयोजित ‘जागर स्त्री कर्तृत्वाचा’ या ऑनलाइन व्याख्यानमालेचा समारोप मंगळवारी (ता.२०) उत्साहात झाला.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी गावात सुसंवादाचे वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे. जातपात, गटतट बाजूला ठेवून आम्ही गावकरी या भावनेतून सर्वांनी एकत्र येत गावाच्या हितासाठी विधायक उपक्रम राबवावेत, असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे विशेष कार्य अधिकारी नानासाहेब कदम यांनी केले. यावेळी ‘गावे व्हावीत आनंदाचे डोह’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून कदम यांनी मार्गदर्शन केले. कदम म्हणाले की, एक गाव, एक स्मशानभूमी या संकल्पनेतून सामाजिक समता, एकात्मतेचा विचार रुजविणे गरजेचे आहे. गावातील प्रत्येक नागरिकाने गावाच्या विकासाची जबाबदारी सामूहिकपणे स्वीकारली पाहिजे. ग्रामस्वच्छता, आरोग्य, क्रीडा, सामाजिक प्रबोधन, सार्वजनिक हिताचे उपक्रम लोकसहभागातून राबविल्यास गावाच्या विकासाला गती मिळेल. गावातील नागरिकांत परस्पर विश्वास, सहकार्य, एकजुटीची भावना निर्माण झाल्यास गाव आनंदी व समृद्ध होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त ११ ते २० ऑक्टोबर या कालावधीत आयोजित या ऑनलाइन व्याख्यानमालेत महिलांचे कर्तृत्व, सामाजिक योगदान, ऐतिहासिक कार्य, विज्ञान, आरोग्य, संविधान आणि महिला सक्षमीकरण अशा विविध विषयांवर मान्यवर वक्त्यांनी विचार मांडले. या व्याख्यानमालेत प्रा.डॉ. संजय जगताप, सौरभ जाधव, प्रा. डॉ. पल्लवी खापरे, सुभाष ढगे, शारदा वायचळे, प्राचार्य डॉ. वैशाली सूर्यवंशी, प्रा. डॉ. रविराज वटणे, प्रा. डॉ. मनीषा ससाणे आणि प्रा. डॉ. नारायण शिंदे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. ज्ञानोबा ढगे, सूत्रसंचालन माधव ढगे यांनी केले. विजय ढगे यांनी आभार मानले.
--------