धाराशिवच्या बासरीवादकाच्या कलेचे
पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडून कौतुक
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. २७ ः जिल्ह्यातील युवा बासरीवादक आणि चित्रकार जगदीश सुतार यांच्या कलागुणांची दखल पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी घेतली आहे. सुतार यांनी स्वतःच्या कुंचल्याने साकारलेले पंडितजींचे सुंदर स्केच त्यांची मुंबई येथील वृंदावन गुरुकुल येथे प्रत्यक्ष भेटून सुपूर्द केले. यावेळी पंडितजींनी या सुरेख कलाकृतीचे भरभरून कौतुक करत त्यांना प्रेमाने पाठबळ दिले.
सुतार यांनी अत्यंत बारकाईने आणि कलात्मकतेने हे पेन्सिल स्केच साकारले आहे. नामवंत बासरीवादक पं. रुपक कुलकर्णी, अमर ओक, घनश्याम चंद, वैष्णवी जोशी, संभाजी कुदळे यासारख्या कलाकारांनी सुतार यांच्या बासरी वादनासह त्यांच्या चित्रकलागुणांचेही कौतुक केले आहे. पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या प्रतिष्ठित वृंदावन गुरुकुलमध्ये प्रत्यक्ष जाऊन बासरी वादनाचा सखोल अभ्यास करण्याची सुवर्णसंधी आता सुतार यांना मिळणार आहे. बासरी वादनाची साधना करत असतानाच चित्रकलेची आवड जोपासत सुतार यांनी आपल्या कलेतून गुरूविषयीची श्रद्धा व्यक्त केली आहे.
.......
धाराशिव ः पं. हरिप्रसाद चौरसिया यांना स्वतः साकारलेले पेन्सिल स्केच भेट देताना युवा बासरीवादक आणि चित्रकार जगदीश सुतार.
फोटो क्रमांक ः OSM26B07286