करमाड , ता. (बातमीदार) : जयपूर शिवारातील एमआयडीसी परिसरात कंपनीचे रस्त्याचे काम बंद पाडल्याचा जाब विचारणाऱ्या सुरक्षा रक्षकावर चौघांनी हल्ला केल्याची घटना २१ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या हल्ल्यात सुरक्षा रक्षकाच्या डोक्याला दुखापत झाली असून, चाकूने वार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी योगेश्वर हरिचंद्र मते (वय ३५, रा. जयपूर) यांनी करमाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश्वर मते हे जयपूर एमआयडीसीतील कंपनीत सुमारे वर्षभरापासून सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. २१ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे कर्तव्यावर होते. दुपारी एकच्या सुमारास जयपूर शिवारातील कंपनीचे रस्त्याचे काम काही जणांनी बंद पाडले होते. कंपनीच्या मालकाशी बोलताना संबंधितांकडून सर्वांना ‘पीयूपी प्लॉट’ देण्याची मागणी केली जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे.यावेळी मते यांनी संबंधितांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर अनिल मते याने मते यांची गच्ची धरून शिवीगाळ करत छातीत फायटरने मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर अजय मते याने जवळील चाकूने मते यांच्या डोक्याच्या उजव्या व डाव्या बाजूस मारून दुखापत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, राजू मते याने चापट-बुक्क्यांनी तसेच लाथांनी पोटात मारहाण केल्याचा आरोप आहे. तर नारायण काशीनाथ मते याने ‘पुन्हा आमच्या वादात पडला तर जिवंत ठेवणार नाही’, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. मारहाण सुरू असताना संतोष अशोक कोळगे व कृष्णा निवृत्ती ठोंबरे यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविल्याचेही मते यांनी पोलिसांना सांगितले.
मारहाणीत दुखापत झाल्याने मते यांनी प्रथम करमाड येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर डिस्चार्ज मिळाल्यावर त्यांनी करमाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे आपल्याला व कुटुंबीयांना संबंधितांकडून धोका असल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी अनिल वैजीनाथ मते, अजय वैजीनाथ मते, राजू आबासाहेब मते आणि नारायण काशीनाथ मते यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल प्रशांत नांदवे करीत आहेत.