नांदेड विभागाच्या जळकोटमार्गे तीन बस
----
विकास परिषदेच्या मागणीला यश; प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण
------
जळकोट, ता. १२ (शहर बातमीदार) ः नांदेड विभागाने बुधवार (ता. ११) पासून जळकोटमार्गे तीन बस सोडल्यामुळे प्रवासांची सोय झाली असून, विकास परिषदेच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे.
जळकोटमार्गे उदगीर ते नांदेड या मार्गावर अनेक वर्षांपासून बससेवेची कमतरता जाणवत होती. यापूर्वी प्रामुख्याने उदगीर आगारातून दिवसभरात सहा बसफेऱ्या होत होत्या. मात्र, सकाळी नऊनंतर जळकोटमार्गे नांदेडला जाण्यासाठी बस उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रवाशांना बसची वाट पाहत तासनतास थांबावे लागत होते. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी नांदेड आगारातूनही जळकोटमार्गे बससेवा सुरू करावी, अशी मागणी विकास परिषदेकडून नांदेड आगाराकडे अनेक दिवसांपासून होत होती.
जळकोट येथील विकास परिषद, सामाजिक कार्यकर्ते व प्रवाशांनी नांदेडच्या आगारप्रमुखांकडे सातत्याने पाठपुरावा केला. प्रवाशांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन नांदेड येथील विभाग नियंत्रकांनी अखेर जळकोटमार्गे उदगीरसाठी तीन बस सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे, जळकोटमार्गे नांदेड ते उदगीर बससेवा वाढविण्याबाबत राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनीही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तीन नवीन बसच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या या सेवेमुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला आहे.
----
दररोज सहावेळा नांदेडला जाण्याची सुविधा
नवीन वेळापत्रकानुसार बुधवारपासून नांदेड बसस्थानकातून सकाळी सात, आठ आणि नऊला, तसेच दुपारी १.४५, २.३० आणि ३.३० ला बस सुटणार आहेत. उदगीर बसस्थानकातून सकाळी १०.३०, ११.१५ आणि १२.१५ ला, तसेच सायंकाळी पाच, सहा आणि सातला बस सुटणार आहेत. या बस जळकोटमार्गे धावणार असल्याने दोन्ही बाजूंनी प्रवाशांना दिवसभरात सहावेळा प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.