जळकोटची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
---
हरकती, नाव वगळण्यासाठी सप्टेंबरअखेरपर्यंत मुदत
-------------
जळकोट,ता.३ : उदगीर विधानसभा मतदारसंघातील जळकोट तालुक्याअंतर्गत पुनरिक्षण प्रक्रियेअंतर्गत प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही प्रारूप मतदार यादी संबंधित मतदान केंद्रांवर तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदार यादीसाठी अर्हता ता.एक ऑक्टोबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट नसल्यास नाव नोंदविण्यासाठी, एखाद्या नावाच्या समावेशास आक्षेप असल्यास किंवा मतदार यादीतील नाव, पत्ता अथवा इतर तपशीलात दुरुस्ती आवश्यक असल्यास संबंधित नागरिकांनी ता. ३० सप्टेंबर किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यात दावा अथवा हरकत दाखल करावी. तसेच,ता. १ ऑक्टोबर २०२६ रोजी १८ वर्षे पूर्ण करणारे पात्र नागरिक मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म क्रमांक ६ द्वारे दावा दाखल करू शकतात. नाव वगळणे किंवा आक्षेप नोंदविण्यासाठी फॉर्म क्रमांक ७, तर मतदार यादीतील तपशीलात दुरुस्तीसाठी फॉर्म क्रमांक ८ वापरता येणार आहे. दावे व हरकती सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात किंवा संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे दाखल करता येतील. जळकोट तालुक्यात सहायक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले असून, त्यांच्याकडे संबंधित यादी भागानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे मतदारांनी प्रारूप मतदार यादी तपासून आपले नाव, पत्ता व इतर तपशील अचूक असल्याची खात्री करावी. काही त्रुटी आढळल्यास अथवा नाव समाविष्ट करावयाचे असल्यास विहित मुदतीत आवश्यक दावा किंवा हरकत दाखल करावी, असे आवाहन तहसीलदार राजेश लांडगे यांनी केले आहे.
----