जळकोटमध्ये राष्ट्रीयीकृत एकच बँक
ग्राहकांची गैरसोय, नवीन शाखा सुरू करण्याची मागणी
-----
जळकोट, ता. १ (शहर बातमीदार) : महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवर वसलेल्या डोंगरी व दुष्काळग्रस्त जळकोट तालुक्यात राष्ट्रीयीकृत बँकेची केवळ एकच शाखा असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या तालुक्यात या एकमेव शाखेत दररोज गर्दी होत असून, ग्राहकांना तासनतास, तर अनेकदा दिवसभर रांगेत थांबावे लागत आहे. त्यामुळे जळकोट येथे राष्ट्रीयीकृत बँकेची नवीन शाखा सुरू करण्याची मागणी होत आहे.
जळकोट तालुक्याची निर्मिती होण्यापूर्वीपासून येथे तत्कालीन स्टेट बँक ऑफ हैदराबादची शाखा कार्यरत आहे. तालुक्याची निर्मिती होऊन २७ वर्षे उलटली. या काळात अनेक शासकीय कार्यालये सुरू झाली, लोकसंख्या वाढली आणि आर्थिक व्यवहारांतही मोठी वाढ झाली. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकेची दुसरी शाखा सुरू झालेली नाही. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील मजुरी, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या, निवृत्तिवेतन, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे आणि विविध शासकीय अनुदाने थेट बँक खात्यांत जमा होत असल्याने बँक खात्यांची गरज वाढली आहे. परिणामी, खातेदारांची संख्या वाढत असताना शाखांची संख्या मात्र कायम आहे. नवीन खाते उघडणे, रोकड जमा करणे व काढणे, पासबुक नोंदी, कर्जप्रकरणे आणि अन्य दैनंदिन बँकिंग सेवांसाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या लोकसंख्येचा आणि आर्थिक व्यवहारांचा विचार करून जळकोट येथे राष्ट्रीयीकृत बँकेची नवीन शाखा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.