दुहेरी पदभारामुळे जळकोटच्या
आरोग्य व्यवस्थेवर परिणाम
---------------
जळकोट, ता. १५ (बातमीदार) ः तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे मागील दोन वर्षांपासून जिल्हा हिवताप अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आल्याने तालुक्यातील आरोग्य सेवा आणि प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. जळकोट तालुक्यासाठी स्वतंत्र व पूर्णवेळ तालुका आरोग्य अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, तालुका शाखा जळकोटच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना जिल्हा हिवताप अधिकारी पदाच्या अतिरिक्त जबाबदारीमुळे जिल्हास्तरीय बैठका, आढावा, अहवाल सादरीकरण आणि प्रशासकीय कामकाजासाठी वेळ द्यावा लागतो. त्यामुळे तालुक्यातील आरोग्य संस्थांचे नियमित पर्यवेक्षण, कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी आणि शासकीय आरोग्य योजनांच्या संनियंत्रणासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची चिंता निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. डोंगरी व दुर्गम भाग
असलेल्या जळकोट तालुक्यात ग्रामीण आरोग्य संस्थांचे नियंत्रण, कर्मचाऱ्यांमधील समन्वय आणि नागरिकांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे एकाच अधिकाऱ्याकडे दोन महत्त्वाच्या पदांचा कार्यभार असल्याने प्रशासकीय कामकाजावर मर्यादा येत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. जिल्हा हिवताप अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वतंत्र अधिकाऱ्याकडे सोपवून जळकोटसाठी पूर्णवेळ तालुका आरोग्य अधिकारी नियुक्त करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.