जालना बनणार उद्योगांचे नवे केंद्र!
----
गोविंद गोयल : ड्रायपोर्टमुळे आयात-निर्यात होणार सुलभ
----
((मुख्य इंट्रो))
गोल्डन जुबिली स्कूलमधून शैक्षणिक प्रवासाला सुरवात केलेल्या गोविंद गोयल यांनी प्राथमिक शिक्षणानंतर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे पुण्यातील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीआयटी) येथून उत्पादन अभियांत्रिकी विषयात अभियांत्रिकी पदवी (बी.ई.) प्राप्त केली. त्यानंतर अमेरिकेतील अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमधून यांत्रिक अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी (एम.एस.) संपादन केली. पदव्युत्तर शिक्षणादरम्यान इंधनपेशीवर आधारित संकरित वाहन प्रकल्पावरील संशोधनासाठी त्यांना जनरल मोटर्स (जीएम) यांची शिष्यवृत्ती मिळाली. या संशोधनामुळे प्रगत अभियांत्रिकी तंत्रज्ञान, संशोधन आणि शाश्वत वाहतूक क्षेत्रातील आधुनिक संकल्पनांचा अभ्यास करण्याची मोलाची संधी त्यांना मिळाली.
----
((सेकंड इंट्रो))
शैक्षणिक प्रवासामुळे विश्लेषणात्मक विचार, नावीन्यपूर्ण दृष्टिकोन आणि समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता विकसित झाली. ही कौशल्ये व्यावसायिक प्रवासात त्यांना आजही मार्गदर्शक ठरत आहेत. २०१६ मध्ये कौटुंबिक व्यवसाय असलेल्या कालिका स्टील्समध्ये काम करण्यास सुरवात केली. येथे तांत्रिक ज्ञानाचा आणि आंतरराष्ट्रीय अनुभवाचा उपयोग उत्पादन प्रक्रिया, कामकाजाचे व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि व्यवसायवृद्धी यांसारख्या विविध क्षेत्रांत करण्याची संधी मिळाली. स्टील उद्योगाच्या यशानंतर आता वाहननिर्मिती, कृषी प्रक्रिया, लॉजिस्टिक्स आणि पूरक उद्योगांना जालन्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या औद्योगिक विस्तारासोबत हॉटेल व्यवस्थापन आणि खाद्यसेवा क्षेत्रातही नव्या संधींची दारे उघडणार आहेत.
------
उद्योगवाढीसाठी दळणवळणाच्या सुविधांची गरज असते. जालन्यात ड्रायपोर्ट सुरू झाला असून, समृद्धी महामार्गाची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या जालना हे उद्योगवाढीसाठी पोषक ठरत आहे. येथे उपलब्ध होत असलेल्या सुविधांची देशभरातील उद्योजकांना माहिती व्हावी आणि त्यांनी जालन्यात उद्योग सुरू करावेत, यासाठी ‘जालना फर्स्ट’च्या माध्यमातून औद्योगिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याचा काळ जालना उद्योगवाढीसाठी केंद्रबिंदू ठरणारा आहे, असे ‘जालना फर्स्ट’चे अध्यक्ष तथा स्टील उद्योजक गोविंद गोयल यांनी व्यक्त केले आहे.
गोयल यांनी ड्रायपोर्ट, नवीन उद्योगांसाठी असलेल्या संधी आणि त्या अनुषंगाने शासन व प्रशासन स्तरावरील अपेक्षित हालचालींवर आपली भूमिका मांडली. गोयल म्हणाले, की ड्रायपोर्ट आता सुरू झाला आहे. मागणीनुसार ड्रायपोर्टवरून रेल्वेद्वारे मालाची आयात आणि निर्यात सुरू झाली असून, आतापर्यंत दहा ते बारा मालगाड्यांच्या फेऱ्या ड्रायपोर्टमार्फत झाल्या आहेत. त्यातून सुमारे दहा टक्के लाॅजिस्टीक (वाहतूक) खर्चाची उद्योजकांची बचत झाली आहे. येथेच आता कस्टमचे कार्यालय सुरू होत आहे. ड्रायपोर्टच्या ४०० ते ४५० एकर भूभागाचा विस्तारही होणार आहे. त्यासाठी मोठी गोदामे, शीतगृहांसाठी उद्योजकांना भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उद्योजकांनी मागणी नोंदवण्यास सुरवात केली आहे. येथील उद्योगांसाठी ड्रायपोर्ट हा दळणवळणाचा महत्त्वाचा दुवा आहे. येथे येथे नवीन उद्योजकांनी गुंतवणूक केली, तर रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत.
-----
ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स यावेत
जालन्यात स्टील उद्योगासह ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स कंपन्याही आल्या पाहिजेत. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील सर्व ऑटोमोबाइल उत्पादक कंपन्यांना औद्योगिक परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. शिवाय मुंबई, पुणे येथील वेअर हाऊस, कृषी प्रक्रिया उद्योगातील उद्योजकांनीही जालन्यात यावे. त्यासाठी या औद्योगिक परिषदांतून प्रयत्न केले जाणार आहेत, असे गोयल यांनी सांगितले.
-----
युनिट शिवाय उद्योग वाढू शकत नाही
जालन्यातील स्टील उद्योग हा एकजुटीमुळे वाढला आहे. येथे प्रत्येक उद्योजक दुसऱ्या उद्योजकाला सर्वतोपरी मदत करतो. त्याच पद्धतीने आता जालन्यात नवीन उद्योग आल्यानंतर येथील स्थानिक उद्योजक त्यांना मदत करणार आहेत. उद्योगामध्ये स्पर्धा नको, असे संकुचित धोरण जालना स्टील उद्योजकांनी कधीच ठेवले नाही. ही शिकवण आमच्या वडिलोपार्जित पिढीने आम्हाला दिली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आम्ही जालना उद्योग पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे गोयल म्हणाले.
----
नवीन उद्योगांसाठी दोन हजार एकर जागेची गरज
एमआयडीसीच्या तिसऱ्या टप्प्यातही आता जागा शिल्लक नाही. त्यामुळे नवीन उद्योगांसाठी किमान दोन हजार एकर जागा एमआयडीसीने उपलब्ध करून देण्याची गरज आहे. ही जागा उद्योगांच्या वाहतुकीसाठी सुलभ ठरेल, अशा ठिकाणी असावी. याशिवाय छत्रपती संभाजीनगर येथील बिडकीन औद्योगिक वसाहत आणि ड्रायपोर्टला जोडणारा औद्योगिक मार्ग तयार झाला, तर जालन्यात देशभरातील उद्योग दाखल होतील, असेही गोयल यांनी सांगितले.
----
उद्योग क्षेत्रात आठ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे संकेत
जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी काही महिन्यांपूर्वी औद्योगिक शिखर परिषद आयोजित केली होती. या परिषदे उद्योजकांनी सुमारे आठ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची तयारी दर्शविली आहे. या गुंतवणुकीमुळे जालना जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विविध क्षेत्रांतील उद्योजकांनी गुंतवणुकीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आगामी काळात जिल्ह्यात नवीन उद्योगांची भर पडण्याची शक्यता आहे. या परिषदेत पोलाद, वाहन उद्योग, कृषी प्रक्रिया, वस्त्रोद्योग, लॉजिस्टिक्स आणि इतर पूरक उद्योगांच्या विकासावर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील औद्योगिक पायाभूत सुविधा, उपलब्ध मनुष्यबळ आणि उद्योगविस्ताराच्या संधी यांचा विचार करून उद्योजकांनी गुंतवणुकीची तयारी दर्शविली, असे ते म्हणाले. या प्रस्तावित गुंतवणुकीतून नवीन रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासह स्थानिक लघु व मध्यम उद्योगांना संधी उपलब्ध होऊ शकते. मात्र, प्रत्यक्ष गुंतवणूक, प्रकल्पांची उभारणी आणि रोजगारनिर्मितीचे चित्र पुढील कार्यवाहीवर अवलंबून राहणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
----
हॉटेल व्यवसायाला वाढत्या विस्ताराची संधी
शहराचा औद्योगिक विस्तार आणि वाढती लोकसंख्या यामुळे हॉटेल व्यवस्थापन क्षेत्राला मोठी संधी निर्माण होत आहे. शहरात नवीन उद्योग, व्यावसायिक आस्थापना आणि नागरी वसाहती वाढत असल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ आणि खाद्यपदार्थ व्यवसायांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. औद्योगिक परिषदांसह विविध व्यावसायिक उपक्रमांसाठीही निवास आणि भोजन सुविधांची गरज भासणार आहे. या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी वाढू शकते. अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, ग्राहकसेवा आणि आधुनिक व्यवस्थापन पद्धती यांना महत्त्व प्राप्त होणार आहे. स्थानिक युवकांना हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेऊन रोजगाराच्या संधी मिळविता येतील. तसेच नवीन हॉटेल, उपाहारगृहे आणि खाद्यसेवा व्यवसाय सुरू करण्यासाठीही पोषक वातावरण निर्माण होत आहे. औद्योगिक विकासासोबत हॉटेल व्यवसायाचा विस्तार झाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होईल.