
जालना : पोलिसांच्या दामिनी पथकाचे कार्यालय. मंगळवारी (ता. चार) सायंकाळी फोन खणखणला. पलीकडून कापऱ्या आवाजात एक मुलगी बोलायला लागली, ‘साहेब, अंबडमधून माझ्या मैत्रिणीचे कुणीतरी अपहरण केले. ती अहिल्यानगरमध्ये आहे. प्लीज प्लीज तिला वाचवा!’ तिचे हे बोलणे ऐकून पोलिस यंत्रणा अलर्ट झाली. जालना पोलिस दलातील ‘भरोसा सेल’चे पथक तत्काळ अहिल्यानगरकडे रवाना झाले. तिथून मुलीला ताब्यात घेतले. पण, पालक रागावल्याने संबंधित मुलीने स्वतः स्वतःच्या अपहरणाचा बनाव केल्याचे नंतर उघड झाले. परंतु, यामुळे पोलिसांची मोठी धावपळ झाली.